breaking-newsपुणेमहाराष्ट्र

नवरात्रोत्सवात जुईला प्रतिकिलो १२०० रुपयांचा विक्रमी भाव!

चमेली ८०० ते ११०० रुपये, कागडा ४०० ते ५०० रुपये किलो

नवरात्रोत्सवात महिलांकडून जुई, चमेली, कागडा या फुलांपासून तयार करण्यात आलेले गजरे आणि वेण्यांना मोठी मागणी असते. या फुलांपासून तयार करण्यात आलेली वेणी देवीला अर्पण करतात. शहरातील फूल विक्रेते तसेच हार विक्रेत्यांकडूनही जुई, कागडा, चमेली या फुलांना मागणी वाढली आहे. मागणीच्या तुलनेत आवक कमी असल्याने जुईला विक्रमी भाव मिळाला असून, प्रतिकिलो ११०० ते १२०० रुपये या दराने जुईची विक्री केली जात आहे.

जुई, चमेली, शेवंती या फुलांचा वापर करून गजरे तसेच शेवंतीपासून वेण्या तयार केल्या जातात. मार्केट यार्डातील घाऊक फूल बाजारात प्रतवारीनुसार प्रतिकिलो जुईला एक हजार ते बाराशे रुपये किलो असे दर मिळत आहेत. चमेलीला आठशे ते अकराशे आणि कागडय़ाला चारशे ते पाचशे रुपये किलो असे दर मिळाल्याचे फूल बाजार आडते संघटनेचे अध्यक्ष आप्पा गायकवाड यांनी सांगितले. कागडय़ाच्या फुलांपासून गजरे तयार करण्यात येतात. जुई, चमेलीची फुले सुवासिक असतात. कागडा सुवासिक नसतो. जुईची फुले दोन दिवस टिकतात तर चमेली अवघी एक दिवस टिकते. जुईपेक्षा चमेली जास्त सुवासिक असते, असे गायकवाड यांनी नमूद केले.  सध्या घाऊक बाजारात दररोज चमेली ४० ते ५० किलो, जुई २० किलो अशी आवक होत आहे. कर्नाटकातील गदग येथून कागडय़ाची आवक होत आहे. तेथील शेतकरी दररोज एसटीमधून पुण्यातील फूल बाजारात कागडय़ाची फुले विक्रीसाठी पाठवतात. सिंहगड रस्त्यावरील नांदेड, शिवणे भागातून फुलांची आवक होत आहे. यवत, माळशिरस, सुपे, पारनेर भागातून शेवंतीची आवक होत आहे. प्रतिकिलो शेवंतीला ४० ते १०० रुपये असा दर मिळत आहे.

फुलांची तोडणी जिकिरीची

गणेशोत्सव, नवरात्रोत्सव, दिवाळीत चमेलीला मोठी मागणी असते. चमेलीच्या फुलांची तोडणी करणे जिकिरीचे काम असते. यंदा सात ते आठ गुंठय़ांमध्ये चमेलीची लागवड केली आहे. दररोज आठ ते दहा किलो चमेली बाजारात विक्रीसाठी पाठवत आहे. मागणी चांगली असल्याने चमेलीला दर चांगला मिळत आहे. चमेलीची लागवड फायदेशीर आहे, मात्र तोडणी काळजीपूर्वक करावी लागत असल्याचे शिरूर तालुक्यात असलेल्या कोंढापुरी गावातील फूल उत्पादक शेतकरी संतोष कुदळे यांनी सांगितले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button