breaking-newsमहाराष्ट्रमुंबई

धोकादायक झाडे तोडण्यासाठी परवानगीची प्रतीक्षा

धोकादायक वृक्ष कापण्यासाठी परवानगी मागणारे प्रस्ताव मुंबई महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरणाकडे आले आहेत. संपूर्ण मुंबईतून २४ प्रस्ताव आले असून त्यात ४३ झाडे कापण्याची परवानगी मागण्यात आली आहे.

पावसाळ्याला सुरुवात होण्याआधीच वायू वादळाच्या तडाख्याने गेल्या आठवडय़ात सुमारे ५०० झाडे पडली आणि तीन जणांना प्राणही गमवावे लागले. झाडे पडल्यामुळे होणाऱ्या अशा दुर्घटनांचा मुंबईकरांनी धसका घेतला आहे.

वायू वादळामुळे गेल्या आठवडय़ात मोठय़ा प्रमाणावर झाडे व फांद्या पडण्याच्या घटना घडल्या, तर या दुर्घटनांमध्ये तीन जणांना  प्राणही गमवावे लागले. अंधेरीच्या तक्षिला सोसायटीतील झाड अंगावर पडल्यामुळे अनिल घोसाळकर या वाहनचालकाचा मृत्यू ओढवला, तर बीएआरसी येथे एका कर्मचाऱ्याचा झाड पडून मृत्यू झाला. मालाडमध्येही शैलेश राठोड यांच्या अंगावर झाडाची फांदी पडल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. या दुर्घटनांमुळे खासगी सोसायटय़ांमधील धोकादायक झाडांचा प्रश्न गंभीर झाला आहे.

रस्त्यांवरील आणि उद्यानांतील झाडांची देखभाल महापालिका प्रशासनातर्फे केली जाते. मात्र खासगी जागेवरील झाडांची छाटणी त्या संस्थांनाच करून घ्यावी लागते. अशा  दुर्घटनांमुळे मोठय़ा प्रमाणावर खासगी सोसायटय़ा, सरकारी आस्थापनांनी महापालिकेकडे धोकादायक वृक्ष तोडण्याची परवानगी मागितली आहे.

संपूर्ण मुंबईतून धोकादायक आणि मृत वृक्ष कापण्याचे तब्बल २४ प्रस्ताव वृक्ष प्राधिकरणाकडे परवानगीसाठी आले आहेत. एका बाजूला वृक्ष प्राधिकरणमध्ये तज्ज्ञ व्यक्ती नसल्यामुळे विकासकामांसाठी झाडे कापण्यास परवानगी देण्यास न्यायालयाने मनाई केली आहे. त्यामुळे विकासकामांसाठी झाडे कापण्याचे अनेक प्रस्ताव आधीच परवानगीच्या प्रतीक्षेत असताना आता सोसायटय़ांनी मृत व धोकादायक झाडे कापण्यासाठी प्राधिकरणकडे परवानगी मागितली आहे.

सिमेंट काँक्रीटच्या थरामुळे झाडांना धोका

रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडांच्या अवतीभवती सिमेंट काँक्रीटचे थर चढवलेले असल्यामुळे झाडांच्या मुळांना पसरायला जागाच मिळत नाही. तसेच झाडांच्या मुळाशी अजिबातच माती नसल्यामुळे त्यांच्या मुळांमध्ये पाणीही झिरपत नाही. त्यामुळे झाडे मृत होतात. त्यातच पालिकेतर्फे झाडांची जी काही छाटणी केली जाते ती करताना झाडांचा समतोल बघितलाच जात नाही. त्यामुळे थोडासा वारा आला की झाडे उन्मळून पडतात, अशी प्रतिक्रिया सामाजिक कार्यकर्ते दयानंद स्टॅलिन यांनी दिली आहे. झाडांच्या आजूबाजूचे काँक्रीट काढून तिथे माती टाकावी, असे आदेश न्यायालयाने सन २०१५ मध्ये पालिकेला दिले होते. मात्र त्याचे पालन होत नसल्यामुळे शहरात झाडे मृत होण्याचे प्रमाण वाढतच जाणार असल्याचेही स्टॅलिन यांनी म्हटले आहे. जंगलात किंवा नॅशनल पार्कमध्ये, आरे कॉलनीत झाडे का पडत नाहीत, शहरातच का पडतात, असाही सवाल त्यांनी केला आहे.

झाडे कापण्याचे विभागवार प्रस्ताव

  • मुलुंड टी विभाग – ११
  • भायखळा ई विभाग – ८ (पश्चिम रेल्वे हद्दीतील ४ झाडे)
  • नाना चौक डी विभाग – १
  • वरळी जी दक्षिण – ५
  • कुर्ला एल विभाग – १०
  • चेंबूर, एम पश्चिम, – २
  • भांडुप एस विभाग – २
  • दहिसर आर उत्तर – ४
Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button