breaking-newsराष्ट्रिय

धावत्या गाडीला लागली आग, कुटुंबातील तिघांचा होरपळून मृत्यू

पूर्व दिल्लीमधील अक्षरधाम उड्डाणपुलाजवळ झालेल्या एका भीषण अपघातामध्ये एका महिलेसहीत तिच्या दोन मुलींचा होरपळून मृत्यू झाला आहे. धावत्या गाडीला अचानक आग लागली. गाडीमध्येच थांबवली असती तर मागून येणाऱ्या गाड्यांचाही अपघात होऊन अनेकांचे प्राण धोक्यात आले असते म्हणूनच गाडी चालक उपेंद्र मिश्रा यांनी उड्डाण पुलावर गाडी भररस्त्यामध्ये थांबवण्याऐवजी बाजूला घेऊन थांबवली. मात्र तोपर्यंत आग बरीच वाढली होती. उपेंद्र आपल्या एका मुलीला घेऊन कसेबसे गाडीबाहेर पडले. पण गाडीमध्ये असणारी त्यांची पत्नी आणि दोन मुलींचा होरपळून दूर्देवी मृत्यू झाला.

उपेंद्र यांची गाडी उड्डाणपुलावर चढल्यानंतर गाडीच्या मागच्या भागाला अचानक आग लागली. मात्र उपेंद्र यांनी अचानक गाडी थांबवण्याऐवजी ती रस्त्याच्या एकाकडेला घेतली आणि बाजूलाच बसलेल्या आपल्या मुलीला घेऊन बाहेर उडी मारली. या घटनेचे साक्षीदार असलेल्या बाबुल कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार गाडीने अचानक पेट घेतल्याने गाडीमध्ये मागील बाजूस बसलेल्या प्रवाशांना बाहेर निघता आले आहे. ‘गाडीच्या मागच्या बाजूला आग लागल्यानंतर चालकाना गाडी रस्त्याच्याकडेला घेतली आणि मुलीसोबत बाहेर उडी मारली. मात्र गाडी बाजूला घेईपर्यंत मागील बाजूस आग खूप वाढली. मागील सीटवर बसलेल्या प्रवाशांनी बाहेर पडण्याचा प्रयत्न केला पण गाडीचे दरवाजे लॉक झाल्याने त्यांना बाहेर पडता आले नाही. अनेकांनी गाडीचा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला मात्र गाडीने पेट घेतल्याने गाडीच्या जास्त जवळ जाणे शक्य नव्हते,’ असं कुमार यांनी सांगितले. अग्निशामन दलाच्या अधिकाऱ्यांनी गाडीचे मागील दरवाजे लॉक झाल्याने तीन जणांचा होपळून मृत्यू झाल्याचे सांगितले. या अपघातामध्ये उपेंद्र यांची पत्नी रंजना मिश्रा, मुली रिद्धी आणि निकी या तिघींचा मृत्यू झाला.

अपघात झाल्यानंतर गाडी पेट घ्यायला लागल्यानंतरही उपेंद्र आपल्या कुटुंबाला वाचवण्यासाठी गाडीचा मागचा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न करत होते. मात्र घटनास्थळी उपस्थित असणाऱ्यांनी त्यांना गाडीच्या जास्त जवळ न जाण्यास सांगत मागे खेचले. ‘उपेंद्र गाडीचा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न करत होते. मात्र आग वाढल्यानंतर त्यांनी गाडीजवळ जाऊ नये म्हणून त्यांना धरुन ठेवले. ते मोठ्याने रडत होते. मदतीसाठी हाका मारत होते. मात्र गाडीला पूर्णपणे आग लागली होती. गाडीच्या जवळ उभे राहणेही शक्य नसल्याने आम्हाला कोणालाच गाडीत अडकलेल्यांची मदत करता आली नाही,’ असं करण सरकार या प्रत्यक्षदर्शीने सांगितले.

गाडी जळताना पाहून अनेकजण मिश्रांच्या मदतीला आहे. पोलिसांनीही तातडीने घटनास्थळी धाव घेऊन वाहतूक वळवली. पोलिसांनी उड्डाणपुलावर येणाऱ्या एक मोठ्या ट्रकला वेळीच अडवल्याने मोठा अनर्थ टळल्याचे एका उपस्थित रिक्षाचालकाने सांगितले. अपघातानंतर काही वेळातच पोलीस दलातील बडे अधिकारी, रुग्णवाहिका आणि अग्निशामन दलाचे अधिकारी घटनास्थळी पोहचले. मात्र तोपर्यंत उशीर झाला होता. गाडीला लागलेली आग विझवण्यात आल्यानंतर त्यातील मृतदेह बाहेर काढून शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले. लालबहादुर शास्त्री रुग्णालयाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, गाडीत अडकलेल्यांचे मृतदेह ओळखू न येण्याइतके जळाले आहे. क्रेनच्या सहाय्याने जळालेली गाडी रस्त्याच्या बाजूला करण्यात आली आणि वाहतूक पूर्ववत झाली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मिश्रा त्यांची डस्टन गो ही गाडी विकण्याच्या तयारीत होते. त्यांनी अनेकदा ती ऑनलाइन माध्यमातून विकण्याचा प्रयत्न ही केला होता. रविवारी कुटुंबाबरोबर फिरायला जाण्यासाठी मिश्रा यांनी गाडीबाहेर काढली आणि हा अपघात झाला. सध्या मिश्रा यांना प्रचंड मानसिक धक्का बसला असून काही दिवसांनंतर त्यांची चौकशी केली जाईल अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. प्राथमिक अंदाजानुसार गाडीच्या सीएनजी युटीनमध्ये आग लागल्याने हा अपघात घडल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button