breaking-newsमहाराष्ट्रमुंबई

दोन वर्षांत १२५ पादचारी पूल

मुंबई उपनगरीय रेल्वे मार्गावर डिसेंबपर्यंत ७० तर २०२०मध्ये ५५ पुलांची उभारणी

एल्फिन्स्टन रोड स्थानकातील पादचारी पुलावर झालेली चेंगराचेंगरी आणि अंधेरी गोखले उड्डाणपुलावरील पादचारी मार्गिका कोसळल्याच्या घटनेनंतर पुलांची डागडुजी व नवीन पुलांच्या उभारणीला प्राधान्य दिले जात आहे. याच योजनेचा भाग म्हणून येत्या दोन वर्षांत उपनगरीय रेल्वे स्थानकांच्या मार्गावर १२५ पादचारी पूल उभे केले जाणार असल्याची माहिती रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी दिली आहे. केंद्रीय हंगामी अर्थसंकल्पात मुंबई उपनगरीय रेल्वे मार्गावर होणाऱ्या महत्त्वाच्या कामांची माहिती गोयल यांनी दिली.

१ फेब्रुवारी रोजी सादर झालेल्या अर्थसंकल्पात रेल्वे हद्दीत येणारे उड्डाणपूल व पादचारी पुलांसाठी निधीची तरतूद करण्यात आली आहे. यात पश्चिम रेल्वेवर ४२ पुलांची दुरुस्ती व नवीन पुलांच्या उभारणीसाठी १०० कोटी ८७ लाख रुपये आणि मध्य रेल्वेवरही याच कामांसाठी ९० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. मात्र रेल्वे मंत्रालयाने काढलेल्या प्रसिद्धीपत्रकात रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी नवीन पुलांच्या उभारणीची माहिती दिली आहे. पुलांच्या कामांसाठी तरतूद करतानाच दोन वर्षांत एकूण १२५ पूल उभारण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. यात २०१९ मध्ये डिसेंबपर्यंत ७० पूल आणि जानेवारी २०२० ते डिसेंबर २०२० पर्यंत ५५ पूल असल्याचे गोयल यांनी सांगितले आहे. यात जुने पूल पाडून नव्याने उभारले जातील, तर काही स्थानकांत प्रत्यक्षात नवीन पुलांची उभारणी होईल. यामध्ये काही स्थानकांत पुलांची कामेही वेगाने सुरू आहेत. अर्थसंकल्पात सुरक्षेच्या दृष्टीने मुंबईतील पादचारी पूल, फलाट, पादचारी मार्गिकांना प्राधान्य देण्यात आल्याचे गोयल म्हणाले. त्यासाठी तरतूदही केली आहे.

२०१४ पासून ते आतापर्यंत ८७ पूल बांधण्यात आले. यामध्ये एल्फिन्स्टन रोड स्थानकातील चेंगराचेंगरीच्या घटनेनंतर ४४ पूल बांधण्यात आले आहेत. आता आणखी १२५ पुलांची उभारणी दोन वर्षांत होईल. पूल उभारणीसाठी लागणारा कालावधीदेखील आठ ते नऊ महिन्यांनी कमी होऊन तीन महिन्यांपर्यंत आला असल्याचे सांगितले.

पादचारी पूल कोठे?

* मध्य रेल्वेवरील कुर्ला, दादर, मुलुंड, दिवा, मस्जिद, भांडुप, मुंब्रा, विक्रोळी, टिटवाळा, आसनगाव, उल्हासनगर, कसारा, आंबिवली, शिवडी, वडाळा, गोवंडी, टिळकनगर आदी स्थानके.

*  पश्चिम रेल्वेवरील बोरिवली, बोईसर, अंधेरी, जोगेश्वरी, मालाड, नायगाव आदी स्थानके.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button