breaking-newsक्रिडा

दोनच मिनिटं थांबा, तेवढं पाकिस्तानला हरवून येतो !

“दोनच मिनिटं थांबा, तेव्हढी भाजीला फोडणी टाकते आणि तुम्हाला फोन करते”. ” दोनच मिनिटं थांबा, तेवढं टेबल आवरतो मग आपण जेवायला बसू”. “दोनच मिनिटं थांबा, तेवढा एक मेल करतो मग चहाला जाऊ.” अशा अनेक दोन मिनिटाच्या गोष्टी आपण ज्या सहजतेने बोलतो आणि करतो तितक्याच सहजतेने सध्या भारतीय संघ म्हणत असेल, “दोनच मिनिटं थांबा; तेवढं पाकिस्तानला हरवून येतो.”

अनुकुल परिस्थितीवर यश अवलंबून असणारा पाकिस्तान इतका दुसरा कोणता संघ सध्या क्रिकेट मध्ये नसेल. जेव्हा हवामान,खेळपट्टीवर असलेला ताजेपणा (पिच क्लायमेट), खेळ पट्टीवरील गवत या पैकी कोणतीच गोष्ट स्विंग गोलंदाजीला मदत करत नसते तेव्हा पाकिस्तानी संघ सामन्यात फार लवकर हतबल होतो. आशिया चषकात आत्तापर्यंत भारताचे चारही सामने दुबईच्या स्टेडियम मध्ये झाले. भारतीय फलंदाजांना या खेळपट्टीचे चालचलन पूर्णपणे माहीत झाले आहे. रोहित आणि धवन ज्या प्रकारे पहिल्या चेंडू पासून सहजतेने फलंदाजी करत होते, त्या वरून आपल्याला अंदाज आलाच असेल. पाकिस्तानच्या डावखुऱ्या गोलंदाजांना दुबईच्या स्टेडियम मध्ये त्यांचा नैसर्गिक इनस्विंग मिळत नाहीये हे पूर्णपणे लक्षात आल्याने रोहित आणि धवन फार निवांतपणे, शेवटच्या क्षणी ठरवून चेंडूला दिशा देत आहेत. त्यातून खेळपट्टीवर चेंडू मस्त गतीने बॅट वर येतोय. धवनने पाकविरुद्धच्या सामन्यात एक ऑफस्टम्पच्या थोड्या बाहेर असलेल्या चेंडूला फक्तं पॉइंटच्या दिशेने बॅट लावली तर चेंडू सीमापार गेला. लेट कट ते हुक अशी 360 अंशातली फलंदाजी दोघांनकडूनही पाहायला मिळाली. इंग्लंड मध्ये स्विंगमुळे पछाडल्या गेलेल्या भारतीय फलंदाजांना रक्तातली साखर खूप कमी झाल्यावर एक साखरेचा गुलाबजाम खाल्यावर जसे वाटते तसे फीलिंग आले असेल.

मला पाकिस्तान संघाचं एका गोष्टीबद्दल कायम विलक्षण आशचर्य वाटत आले आहे. हा संघ नेहमी एकाच पॅटर्नने कसा काय हरतो? फलंदाजीत हाराकीरी + झेल सोडण्याची कला + गलथान क्षेत्ररक्षण = पाकिस्तानचा पराभव, हा पॅटर्न इम्रान युग संपले तेव्हापासून चालूच आहे. इम्रान असतानासुद्धा अक्रम आणि वकारने सामने जिंकून दिले ते त्रिफळे उडवून नाहीतर पायचीतच्या मार्गाने. तेव्हा देखील झेल घेतले जात नसत. पाकिस्तानच्या सर्व अकरा क्षेत्ररक्षकांना क्षेत्ररक्षण करताना यष्टीरक्षकाचे ग्लोव्ज दिले तरी ते झेल घेतीलच असे नाही. रविवारच्या सामन्यात रोहितचा १४ धावांवर जो झेल सोडला तो लहान मुलं कॅच कॅच खेळताना तीन बोटात पकडतात. अफगाणिस्तान विरुद्ध सामन्यात तर पाक क्षत्ररक्षकांनी सोडलेले झेल पहाता पाकचे गोलंदाज संपावर कसे जात नाहीत ह्याचे फार कौतुक वाटते. पाकिस्तानचे कोच मिकी आर्थर पूर्वी हिमालयात एका पायावर दहा वर्षे उभे राहून तपश्चर्या करून आले असावेत. त्या शिवाय इतका संयम शक्य नाही. वास्तविक हिमालयात झालेली तपश्चर्या हा पाकिस्तानी कोचच्या बायोडाटा मधील सर्वात वरचा बुलेट पॉईंट असावा. बायोडाटा मध्ये प्रथम संपूर्ण नाव मग हिमालयातली तपश्चर्या आणि मग क्रिकेटचा अनुभव वगैरे दुय्यम गोष्टी. असो, सांगायची गोष्ट अशी की पाकिस्तानचा संघ काहीही करू शकतो हे खरे असले तरी ते अद्वितीय ‘काहीही’ जागतिक स्तरावर किती सातत्याने दिसते हे तपासले पाहिजे.

आता थोडे रोहित आणि धवनच्या बॅटिंग विषयी बोलू, “कितनी नजाकत से पेश आये अपने ये दो लडके ” अशी सहज दाद निघून गेली कालची बॅटिंग बघून. अनुकूल खेळपट्टीवर धवन खेळतो तेव्हा तो डावखुरा रोहित वाटतो. काल रोहित आणि धवनची जुगलबंदी झाली, शॉटला शॉट मॅच झाले. मोहंमद आमिरला एकाच षटकात धवनने मारलेले स्ट्रेट ड्राइव्ह, रोहितचे कव्हर ड्राइव्ह, शॉर्ट आर्म पुल, धवनचे स्केवर लेगला मारलेले पिकअप शॉट सगळंच डोळ्याचं पारणं फेडणारं. चाळीस षटकांच्या संपूर्ण जमून आलेल्या मैफलीचा आनंद सुट्टीच्या दिवशी पुरेपूर मिळाला. यदाकदाचीत पुन्हा पाकिस्तानशी अंतिम सामन्यात गाठ पडली तर आणि चुकून पाकिस्तानने सातत्य दाखवले तर तेही मोडून काढण्याचे बळ भारतीय संघास मिळो आणि आशिया चषक भारतात येवो.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button