breaking-newsपुणेमहाराष्ट्र

‘दैवीशक्ती’ची भीती दाखवून तरुणीवर बलात्कार, नराधमास अटक

पुण्यातील कोंढवा परिसरात महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या तरुणीला ‘दैवीशक्ती’ची भीती दाखवून तिच्यावर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी फरीन शेखसह शफीक खान आणि एका अल्पवयीन आरोपीला अटक केली आहे.

मुंढवा क्षेत्रात राहणारी तरुणी महाविद्यालयात बीकॉमच्या प्रथम वर्षात शिकत होती. इंग्रजीतील शिक्षण अवघड जात असल्याने ती महाविद्यालयात जात नव्हती. हा प्रकार तिच्या आईला समजला होता. आपल्यावर संकट आले आहे, अशी भीती तिच्या मनात निर्माण झाली. मैत्रिणींच्या सल्ल्यावरुन ती फरीन शेख या महिलेकडे गेली. फरीनने अंगात दैवी शक्ती असल्याचा दावा केला होता. माझ्याकडे दैवी शक्ती असून परीक्षेच्या कालावधीत तुझ्या अंगात हजरत येईल, मी तुझ्यासोबत परीक्षा केंद्रापर्यंत येईन आणि पेपर संपेपर्यंत बाहेर बसून राहेन, असे तिने पीडितेला सांगितले. सांगितल्यानुसार फरीन पीडितेसोबत परीक्षा केंद्रापर्यंत जायची आणि पेपर संपेपर्यंत बाहेरील बगिच्यात बसून राहायची. पीडितेच्या विश्वासाचा गैरफायदा घेत फरीनने तिला शफीक खानच्या घरी नेले. शफीक हा मंडप व्यावसायिक होता. फरीनने तिला दैवीशक्तीची भीती दाखवली होती. शफीकनेही पीडितेला धमकी देत तिच्यावर बलात्कार केला. शफीककडे काम करणाऱ्या अल्पवयीन मुलानेही तिच्यावर बलात्कार केला होता. २०१६ पासून हा प्रकार सुरू होता.

या घटनेची माहिती अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या एका सदस्याला समजली. त्याने पीडितेसह पुणे पोलिसांकडे धाव घेतली. अखेर उपायुक्त प्रकाश गायकवाड यांनी या तक्रारीची दखल घेतली आणि पोलिसांना गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. ११ डिसेंबर रोजी पोलिसांनी गुन्हा दाखल केला. बलात्कार, धमकी देणे, जादू टोणा प्रतिबंधक कायदा अशा विविध कलमांखाली तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी या प्रकरणातील तिन्ही आरोपींना अटक केली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button