breaking-newsराष्ट्रिय

देशातील स्वच्छ राजधानीचा मान “मुंबई’ला

  • स्वच्छ सर्वेक्षण 2018 चा निकाल जाहिर; महाराष्ट्राला सर्वाधिक 10 पुरस्कार 

नवी दिल्ली – केंद्र शासनाच्या स्वच्छ सर्वेक्षण 2018 मध्ये देशातील सर्वोकृष्ट दुसऱ्या क्रमांकाच्या राज्यासह विविध विभागातील एकूण 52 पारितोषिकांपैकी सर्वाधिक एकूण दहा पारितोषिके महाराष्ट्र राज्याने मिळवली आहेत. देशातील स्वच्छ राजधानीच्या शहराचा मान मुंबई, तर घनकचरा व्यवस्थापनात नवी मुंबई शहराने बाजी मारली आहे.
नवी दिल्लीत झालेल्या पत्रकार परिषदेत गृहनिर्माण व नागरी व्यवहार राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) हरदीपसिंग पुरी यांनी ही घोषणा केली. दरम्यान या पुरस्काराबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आनंद व्यक्त करून विजेत्यांचे अभिनंदन केले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वच्छ भारत अभियानाची सुरूवात केली. या अभियानाअंतर्गत शहरी भागातील स्वच्छतेचे मूल्यांकन करण्यासाठी स्वच्छ सर्वेक्षण 2018 या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. 4 जानेवारी 2018 ते 10 मार्च 2018 या कालावधीत देशातील 4203 शहरांचे सर्वेक्षण करण्यात आले होते.

या स्पर्धेत झारखंड राज्याने सर्वोकृष्ट राज्याचे पहिले पारितोषिक मिळवले. त्यानंतर महाराष्ट्र आणि छत्तीसगढला अनुक्रमे दुसरा व तिसरा क्रमांक मिळविला आहे. तर देशात स्वच्छ शहराचा मान इंदौर शहराने मिळविला आहे. वेगवेगळ्या विभागात राज्यातील नऊ शहरांना स्वच्छ शहरांचे सर्वोकृष्ट पारितोषिके जाहीर झाली आहेत.

स्वच्छ सर्वेक्षणात महाराष्ट्रातील 9 शहरे “स्वच्छ शहरे’ ठरली असून यातील 6 शहरांना राष्ट्रीय स्तरावरील स्वच्छता पुरस्कार, तर 3 शहरांना विभागस्तरीय पुरस्कार जाहिर झाला आहे. नागपूर हे शहर स्वच्छ सर्वेक्षणात देशातील नाविन्यपूर्ण व उत्कृष्ट कार्यशैली असणारे शहर ठरले आहे, तर नवी मुंबई हे शहर घनकचरा व्यवस्थापनात देशातील सर्वोत्तम ठरले आहे.

मराठवाड्यातील परभणी हे शहर स्वच्छ सर्वेक्षणात नागरिकांच्या प्रतिसादात उत्कृष्ट ठरले आहे, तर भिवंडी शहरास गतिमान मध्यम शहर हा पुरस्कार जाहिर करण्यात आला आहे. राज्याची राजधानी असलेल्या शहरांना स्वच्छ सर्वेक्षणात पुरस्कार जाहिर करण्यात आले आहेत. यामध्ये बृहन्मुंबई शहरास सर्वोत्कृष्ट राजधानीचे स्वच्छ शहर असा पुरस्कार जाहिर झाला आहे. भुसावळ शहरास गतिमान लहान शहर हा पुरस्कार जाहिर झाला आहे.

सासवडला “नाविन्यपूर्ण व उत्कृष्ट कार्यशैली’चा पुरस्कार 
देशातील विभागनिहाय पुरस्कारात महाराष्ट्राला पश्‍चिम विभागात 3 पुरस्कार जाहिर झाले आहेत. सातारा जिल्ह्यातील पाचगणी शहराला पश्‍चिम विभागातील सर्वोत्कृष्ट स्वच्छ शहराचा पुरस्कार जाहिर झाला आहे. नागरिक प्रतिसादाच्या बाबतीत दिला जाणारा पुरस्कार अमरावती जिल्ह्यातील शेंदुरजना घाट या शहराला मिळाला आहे. पुणे जिल्ह्यातील सासवड या शहराला नाविन्यपूर्ण व उत्कृष्ट कार्यशैलीचा पुरस्कार जाहिर करण्यात आला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button