breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

दीड वर्षापुर्वी तुकाराम मुंडेनी बंद केलेले पिंपरीचे पीएमपी कार्यालय पुन्हा सुरु

– महापालिकेने 10 एसी बसची पीएमपीकडे मागणी  

पिंपरी – पुणे महानगर परिवहन महामंडळाचे तत्कालीन व्यवस्थापकीय संचालक तथा अध्यक्ष तुकाराम मुंडे यांनी पिंपरीतील पीएमपीचे कार्यालय दीड वर्षापुर्वी बंद केले होते. तेथील प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी स्वारगेटला वर्ग केले होते. त्यामुळे शहरातील पीएमपी बस सेवेबाबत विविध अडीअडचणी, तक्रारी करण्यास नागरिकांना त्रास सहन करावा लागत होता. दरम्यान, तुकाराम मुंडेची बदली झाल्यानंतर तब्बल पाच महिन्यांनी पीएमपीएमएलचे कार्यालय पिंपरीत 18 जूनला पुन्हा करण्यात आले आहे.   

पुणे आणि पिंपरी चिंचवड शहराची वाहतूक व्यवस्था सुरळीत आणि सक्षम व्हावी, याकरिता दोन्ही महानगरपालिकेने पुणे महानगर परिवहन महामंडळ स्थापन केले. त्यानूसार पुण्यासह पिंपरी चिंचवड शहरात बसेस धावत आहेत. पीएमपी बसेस बाबत पिंपरी चिंचवडच्या नागरिकांना तक्रारी, अडीअडचणी मांडता यावेत, शालेय, अंध, अपंग, निराधार, कुष्ठरोगी नागरिकांना तत्काळ पास मिळावेत, अन्य सेवा-सुविधाचा लाभ मिळण्यासाठी पिंपरीत कार्यालय सुरु केले होते. परंतू, पीएमपीएमएल प्रशासनात अपु-या अधिकारी व कर्मचा-याच्या संख्येमुळे तत्कालीन अध्यक्ष तुकाराम मुंडेनी हे कार्यालय बंद करुन तेथील सर्व कामकाज स्वारगेट येथून करण्याचे आदेश दिले. त्यामुळे पिंपरीतील कार्यालय स्थलातंरित केल्याने तब्बल दीड वर्षे नागरिकांना बसेसच्या तक्रारी, मागण्यांबाबत स्वारगेटला जावे लागत होते.

तसेच पिंपरीतील कार्यालय पुन्हा सुरु करावे, याकरिता शहरातील नागरिकांनी अनेकदा मागणी केली. परंतू, त्याकडे कानाडोळा करण्यात येत होता. मात्र, तुकाराम मुंडेची बदली झाल्याने पुन्हा या मागणीचा जोर वाढला. तसेच महापालिकेतून 176 कर्मचारी पीएमपीमध्ये वर्ग केले होते. ते कर्मचारी देखील पुन्हा महापालिका हद्दीत काम द्यावे, म्हणून पाठपुरावा करीत आहेत.

पिंपरी चिंचवड शहरातील नागरिकांच्या मागणीनूसार 18 जूनला पिंपरीतील मेघाजी लोंखडे इमारतीत हे कार्यालय सुरु करण्यात आले. त्या कार्यालयासाठी समन्वय अधिकारी म्हणून संतोष माने यांची नियुक्ती करण्यात आली. त्यामुळे शहरातील नागरिकांनी पीएमपीएमएलच्या विविध मागण्यां, तक्रारी, अडीअडचणी आता स्वारगेट एेवजी पिंपरी कार्यालयाकडे मांडण्यात याव्यात, असे आवाहनही माने यांनी केले आहे.

 शहर दर्शन सेवा लवकरच सुरु

पिंपरी महापालिकेने पीएमपीएमएलच्या व्यवस्थापकीय संचालिका तथा अध्यक्षा नयना गुंडे यांच्याकडे 10 एसी बसेसची मागणी नोंदविली आहे. या बसेस लवकरच पिंपरी चिंचवड शहरात दाखल होणार आहे. त्या बसेस शहरात दाखल झाल्याने पिंपरी चिंचवड दर्शन सेवा सुरु केली जाणार आहे. तसेच अन्य काही मार्गावरही त्या बस धावणार आहेत.  

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button