breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

दिवा विझण्यापूर्वी फडफडतो, भाजप प्रवक्ते थोरात यांची साने यांच्यावर टिका

  • पारदर्शक कारभारामुळे विरोधी पक्षनेत्याची कोंडी
  • भाजपवर आरोप करण्यापलीकडे त्यांच्यासमोर पर्याय नाही

 

पिंपरी  पिंपरी-चिंचवड महापालिकेतील पारदर्शक कारभारामुळे विरोधी पक्षनेते दत्ता साने यांची कोंडी झाली आहे. त्यांच्यासमोर महापालिकेच्या कारभाराबाबत फक्त आरोप करण्यापलीकडे काहीच पर्याय उरलेला नाही. दिवा विझण्यापूर्वी फडफडतो, त्याप्रमाणे आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत शहरातील मतदार राष्ट्रवादीला चांगलाच धडा शिकवतील, असा इशारा पिंपरी-चिंचवड शहर भाजपचे प्रवक्ते अमोल थोरात यांनी दिला आहे.

 

खासदार श्रीरंग बारणे आणि भाजप शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप यांच्यातील वादात उडी मारून विरोधी पक्षनेते दत्ता साने यांनी काल जगतापांवर चांगलीच तोफ डागली होती. दोन्ही नेत्यांनी राजीनामे देऊन पालिकेच्या कामात रस घ्यावा, असा उपरोधीत सल्लाही त्यांनी दिला होता. त्याचा कैवार घेण्यासाठी भाजपचे शहर प्रवक्ते अमोल थोरात यांनी प्रसिध्दीपत्रक काढून साने यांच्यावर जोरदार शाब्दीक हल्ला केला आहे. प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, “दत्ता साने यांना माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मोठ्या विश्वासाने विरोधी पक्षनेतेपद दिले. परंतु, साने यांनी या पदाचा गैरवापर सुरू केला आहे. त्यांच्याकडून शहरातील लोकांची दररोज दिशाभूल सुरू आहे. महापालिकेतील पारदर्शक कारभारामुळे त्यांचा भ्रमनिराश झाला आहे. अनेक प्रकरणाची माहिती मागवूनही त्यात काहीच सापडत नसल्यामुळे साने यांनी भाजपवर टिका करण्याचा मार्ग निवडला आहे.

 

साने यांना स्वतःच्या पक्षाने १५ वर्षांत किती भ्रष्टाचार केला, याचा विसर पडला आहे. झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पात गोरगरीब नागरिकांना निकृष्ट दर्जाची घरे देऊन त्यांची फसवणूक केली. मताच्या राजकारणापायी या प्रकल्पात बोगस लाभार्थी घुसवून खऱ्या लाभार्थ्यांना देशोधडीला लावले. या प्रकल्पाचे काम जादा दराने ठेकेदारांना देण्यात आले. भ्रष्टाचारासाठी देवालाही न सोडणाऱ्या राष्ट्रवादीच्या नेत्यांनी आणि विरोधी पक्षनेते साने यांनी आता सत्ता गेल्यानंतर भ्रष्टाचारावर बोलणे अशोभनिय आहे. गॅस शवदाहिनीच्या खरेदीतून राष्ट्रवादीच्या नेत्यांनी मयताच्या टाळूवरचे लोणी खाण्याचा प्रयत्न केला. दत्ता साने यांनी राष्ट्रवादीचा हा सर्व भ्रष्टाचारी प्रताप शहरातील जनता विसरल्याच्या भ्रमात राहू नये, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

 

पंधरा वर्ष सत्ता भोगूनही शहानपण सूचले नाही

पाणी, कचरा आणि अन्य मूलभूत समस्या म्हणजे आपल्याच पक्षाने शहराला दिलेली देण आहे, हे लक्षात ठेवावे. शहराचे वाढते नागरीकरण आणि पायाभूत सुविधांवर येणारा ताण याचा विचार न करता राष्ट्रवादीने तब्बल १५ वर्षांची सत्ता उपभोगली. दीड दशक सत्तेत राहूनही वाढत्या लोकसंख्येची तहान भागवण्यासाठी कायमस्वरुपी उपाययोजना करण्याचे सुचले नाही. केवळ कागदी घोडे नाचवण्यापलीकडे ठोस काही केले नाही. कचऱ्याची समस्याही सोडवता आली नाही. या प्रश्नांवर भाजप निश्चितच भविष्यकालीन विचार करून कायमस्वरुपी उपाय करेल, हे त्यांनी लक्षात ठेवावे, असेही थोरात यांनी म्हटले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button