breaking-newsपुणेमहाराष्ट्र

दिवाळीनंतर शहरात एक वेळ पाणीपुरवठा

शहराच्या पाणीपुरवठय़ात कपात करण्याचा निर्णय झाला. असून, दिवाळीनंतर शहरात दिवसातून एक वेळ पाणीपुरवठा करण्यात येणार असल्याची माहिती पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी सोमवारी महापालिकेच्या मुख्य सभेत दिली. पाणीकपातीच्या या निर्णयाची अंमलबजावणी दिवाळीनंतर होणार आहे. पाणीपुरवठय़ाचे सुधारित वेळापत्रक महापालिका प्रशासनाकडून तयार करण्यात आले असून त्याची अंमलबजवणी दिवाळीनंतर होईल. दरम्यान, शहरातील पाणीपुरवठा विस्कळीत झाला असून त्याबाबतही पाणीपुरवठा विभागाकडे मोठय़ा संख्येने तक्रारी येत आहेत.

शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला साखळी प्रकल्पातील पानशेत, वरसगाव, टेमघर आणि खडकवासला धरणात यंदा गेल्या वर्षीपेक्षा पाणीसाठा कमी असल्यामुळे शहराच्या पाणीपुरवठय़ामध्ये कपात करण्याचा निर्णय कालवा समितीच्या बैठकीत घेण्यात आला आहे. शहराला दोन वेळ पाणीपुरवठा करण्यासाठी महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून प्रतिदिन १३५० दशलक्ष लिटर पाणी घेण्यात येते. या पाण्यात कपात करून प्रतिदिन ११५० दशलक्ष लिटर पाणी घेण्याची सूचना महापालिकेला करण्यात आली आहे.

प्रतिदिन ११५० दशलक्ष लिटर या हिशोबाप्रमाणे शहरात दिवसातून एक वेळ पाणीपुरवठा होईल, असे कालवा समितीच्या बैठकीनंतर सांगण्यात आले होते. मात्र जलसंपदा विभाग आणि महापालिकेच्या वादात शहराच्या काही भागातील पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. वडगावशेरी, चंदननगर, कळस, विश्रांतवाडी, धानोरी या भागासह सहकारनगर, कोथरूड, कर्वेनगर, सिंहगड रस्ता परिसरातील पाणीपुरवठय़ावर परिणाम झाला आहे. या भागात वेळापत्रकानुसार पाणीपुरवठा होत नसल्याच्या तक्रारी प्रशासनाकडे येत आहेत.

या पाश्र्वभूमीवर सोमवारी महापलिकेच्या मुख्य सभेतही त्याचे पडसाद उमटले. विस्कळीत पाणीपुरवठय़ावरून नगरसेवकांनी प्रशासनावर जोरदार टीका केली. त्यानंतर पाणीपुरवठा विभागाचे अधीक्षक अभियंता प्रवीण गेडाम यांनी त्यावर निवेदन करताना दिवाळीनंतर पाणीकपातीच्या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात येईल, असे सांगितले. पाणीकपातीचा निर्णय झाला असला तरी महापालिकेकडून या निर्णयाची अंमलबजावणी होत नसल्याचे सांगत जलसंपदा विभागाने गेल्या आठवडय़ात पाणी उचलणारे पंप बंद केले होते. त्याचे तीव्र पडसाद शहरात उमटले होते. ऐन सणासुदीच्या कालावधीत पाणीपुरवठय़ात कपात करू नये, अशी मागणीही जोर धरू लागली होती. त्यानुसार महापौर मुक्ता टिळक आणि सभागृहनेता श्रीनाथ भिमाले यांनीही सणासुदीत पाणीपुरवठय़ात कपात होऊ देणार नाही, असे जाहीर केले होते. महापालिका प्रशासनाकडून जलसंपदा विभागाकडे पत्रव्यवहार करण्यात आला होता. त्यानंतर राजकीय सहमतीनेच पाणीकपातीच्या निर्णयाची अंमलबजावणी दिवाळीनंतर करण्याचे निश्चित करण्यात आले होते.

कपातीआधीच विस्कळीत पुरवठा

धरणातून यापूर्वी ठरल्यानुसार म्हणजे प्रतिदिन १३५० दशलक्ष लिटर पाणी उचलण्यात येत असले, तरी शहराच्या बहुतांश भागातील पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. कोथरूड-कर्वेनगर, बावधन, पाषाण, सिंहगड रस्ता, सहकारनगर, पर्वती या भागात विस्कळीत, अपुरा आणि अनियमित पाणीपुरवठा होत आहेत. त्यामुळे आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

सुधारित पाणीपुरवठय़ाचे वेळापत्रक तयार

पाणीकपातीचे वेळापत्रक प्रशासनाकडून करण्यात आले आहे. वेळापत्रकानुसार एक वेळ पाणीपुरवठा करण्यात येणार असून पाण्याच्या वेळाही निश्चित करण्यात आल्या आहेत. आयुक्त आणि महापालिकेतील सत्ताधारी पक्षाच्या सहमतीनंतर हे वेळापत्रक जाहीर करण्यात येईल.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button