दिग्दर्शक नागराज मंजुळे यांचा महाराष्ट्र कुस्ती लीग मध्ये महत्वाचा सहभाग
कुस्ती हा महाराष्ट्रातील अस्सल मातीतला रांगडा खेळ. झी टॉकीजच्या विद्यमाने महाराष्ट्रातील मातीतल्या या खेळाला प्रोत्साहन देण्यासाठी खास ‘झी महाराष्ट्र कुस्ती लीग’ चे आयोजन करण्यात आले आहे. या लीगचा थरार २ नोव्हेंबर ते १८ नोव्हेंबर या कालवधीत पुण्याच्या बालेवाडीत रंगणार आहे. या बहुचर्चित ‘झी महाराष्ट्र कुस्ती लीग’ बरोबर सुरवातीपासूनच महाराष्ट्रातील वेगवेगळ्या क्षेत्रातील दिग्गज नावे जोडली जात आहेत .त्यातीलचं एक महत्वाचे नाव म्हणजे दिग्दर्शक नागराज मंजुळे.
नागराज मंजुळे हे एक अष्टपैलू व्यक्तिमत्व असून ते केवळ दिग्दर्शक नसून लेखक, कवी आणि अभिनेतेही आहेत.आपल्या प्रत्येक कलाकृतीतून संवेदनशीलतेची जाणीव करून देणारे दिग्दर्शक नागराज मंजुळे महाराष्ट्रातल्या खेळाबाबत ही तितकेच सजग आहेत. पिस्तुल्या, फँड्री व सैराट यासारख्या चित्रपटातून आपले सामाजिक भान दाखवून देणारे दिग्दर्शक नागराज मंजुळे आता झी टॉकीजसाठी ‘झी महाराष्ट्र कुस्ती लीग’ चा प्रोमो दिग्दर्शित करणार आहेत आणि मुख्य म्हणजे यात ते अभिनय सुद्धा करणार आहेत.