breaking-newsमहाराष्ट्र

दहा वर्षांनी पुन्हा नांदण्यास नकार दिल्याने पत्नीला कोयत्याने भोसकले

सोलापूर – दहा वर्षांपूर्वी भांडण करून दोघे पती-पत्नी एकमेकांपासून विभक्त झाल्यानंतर पतीने पुन्हा आपल्या गावी येऊन नांदण्यासाठी हट्ट धरला असता त्यास विरोध केल्याने संतापलेल्या पतीने पन्नास वर्षीय पत्नीला चाकूने भोसकल्याची घटना दक्षिण सोलापूर तालुक्यातील कुरघूट येथे घडली. याप्रकरणी पतीविरूध्द मंद्रूप पोलीस ठाण्यात खुनाचा प्रयत्न केल्याच्या  आरोपाखाली गुन्हा दाखल झाला आहे. घटनेनंतर हल्लेखोर पतीने पलायन केले असून त्याचा शोध पोलीस घेत आहे

सुंदराबाई भ्रमण्णा गुमते असे गंभीर जखमी झालेल्या महिलेचे नाव आहे. तिचे माहेर दक्षिण सोलापूर तालुक्यातील सुलेरजवळगे येथील आहे. तर पतीचे गाव शेजारच्या कर्नाटकातील शिरनाळ (ता. इंडी, जि. विजापूर) आहे. त्यांना एक मुलगा व मुलगी आहे. परंतु दहा वर्षांपूर्वी भ्रमण्णाकडून होणाऱ्या सततच्या त्रासाला कंटाळून सुंदराबाई ही माहेरी येऊन राहत होती.

मुले मोठी झाल्यानंतर त्यांचे विवाह झाले. मुलगा व मुलगी कुरघोट येथे राहत असताना सुंदराबाईदेखील त्यांच्याकडेच राहते. दहा वर्षांपासून विभक्त असल्याने तिने पतीचा विचार सोडून दिला होता. तथापि, अलीकडे पती भ्रमण्णा हा पुन्हा पत्नी सुंदराबाईकडे येऊन आपल्यासोबत शिरनाळ येथे येण्याचा आग्रह धरत होता. त्यास ती नकार देत होती. कारण सासरी गेल्यानंतर पतीकडून आपणांस पुन्हा मारझोड होईल, अशी तिला भीती वाटत होती. भ्रमण्णा याने पुन्हा कुरघोट येथे येऊन पत्नी सुंदराबाईला शिरनाळ येथे सोबत येऊन नांदण्यासाठी हट्ट धरला. त्यातून दोघांत भांडण झाले. सुंदराबाईने स्पष्ट नकार दिल्याने तो संतापला. रागाच्या भरात त्याने तिला कोयत्याने भोसकले. यात तिच्या पोटावर, मानेवर, डोक्यावर, पाठीवर, हातावर  वार झाले आहेत. हा खुनीहल्ल्याचा प्रकार असल्याने त्यानुसार पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button