breaking-newsमहाराष्ट्र

दहा टक्के आरक्षणासाठी घटनादुरुस्ती, मग १६ टक्के मराठा आरक्षण कसे?

  • राष्ट्रवादीचा सवाल; मराठा समाजाला आरक्षणाचे आमिष दाखविल्याचा आरोप

आर्थिक दुर्बलांसाठी १० टक्के आरक्षणाची तरतूद करण्याकरिता घटनादुरुस्ती करण्यात आली, मग राज्यात मराठा समाजाला १६ टक्के आरक्षणाची तरतूद कशाच्या आधारे करण्यात आली, असा सवाल करीत राष्ट्रवादी काँग्रेसने मराठा समाजाला आरक्षणाचे आमिष दाखविण्यात आल्याचा आरोप केला आहे.

मराठा समाज ही राष्ट्रवादीची मतपेढी मानली जायची. गेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये मराठा मते मोठय़ा प्रमाणावर भाजप आणि शिवसेनेकडे हस्तांतरित झाली होती. त्यातच मराठा आरक्षणाचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने घेतल्याने आगामी निवडणुकांमध्ये मराठा समाजाची एकगठ्ठा मते मिळण्याची राष्ट्रवादीला खात्री नाही. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीने आर्थिकदृष्टय़ा दुर्बल घटकाच्या आरक्षणाच्या मुद्दय़ावरून भाजपला कात्रीत पकडण्याचा प्रयत्न केला आहे. आर्थिक दुर्बल घटकांच्या १० टक्के आरक्षणाकरिता घटनादुरुस्ती करण्यात आली. मग मराठा समाजाला १६ टक्के आरक्षण कशाच्या आधारे देण्यात आले, असा सवाल राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी केला आहे. राज्यसभेत घटनादुरुस्ती विधेयकावर झालेल्या चर्चेतही पटेल यांनी हाच मुद्दा मांडला होता.

राज्यातील फडणवीस सरकारचा साडेचार वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झाल्यावर आता ७२ हजार पदांची मेगाभरती करण्यात येणार आहे. या भरतीत मराठा समाजाला १० टक्के की १६ टक्के आरक्षण लागू होणार, असा सवालही पटेल यांनी केला आहे. मराठा आरक्षणाच्या मुद्दय़ावर भाजपला अडचणीत आणण्याचा राष्ट्रवादीचा डाव असल्याचे पटेल यांच्या भूमिकेवरून स्पष्टच होते.

राज्यातील आरक्षणाचे प्रमाण हे ६६ टक्के

घटनादुरुस्ती करून १० टक्के आरक्षण लागू करण्यात आले आहे. मग महाराष्ट्रात मराठा समाजाच्या आरक्षणात सहा टक्के कपात करून ते १० टक्के करण्यात येणार का, असा सवालही पटेल यांनी केला आहे. १६ टक्के आरक्षणाचा निर्णय घेतल्याने राज्यातील आरक्षणाचे प्रमाण हे ६६ टक्के झाले आहे. ५० टक्क्यांच्या वर १० टक्के आरक्षण ठेवण्याकरिता घटनादुरुस्ती करण्यात आली. मग मराठा आरक्षण टिकणार कसे, असा प्रश्नही  राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल  यांनी उपस्थित केला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button