breaking-newsआंतरराष्टीय

दहशतवादी गटांकडून आता काश्मिरी तरुणांचे ‘हनी ट्रॅपिंग’

जम्मू-काश्मीरमधील युवकांना दहशतवादाकडे वळवण्यासाठी आणि त्यांचा उपयोग शस्त्रे एका ठिकाणाहून दुसरीकडे नेण्यासाठी किंवा घुसखोरी करणाऱ्या दहशतवाद्यांचे ‘मार्गदर्शक’ म्हणून काम करण्यासाठी पाकिस्तानातील दहशतवादी गट आता ‘हनी ट्रॅपिंग’ ही नवी पद्धत वापरत असल्याचे उघड झाले आहे.

या संदर्भात मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे बंदीपूर येथील रहिवासी असलेल्या तिशीतील सैयद शाझिया या तरुणीला १५ दिवसांपूर्वी अटक करण्यात आली. फेसबुक व इन्स्टाग्रामसारख्या समाजमाध्यमांवर तिची अनेक खाती होती आणि काश्मीर खोऱ्यातील अनेक युवक ती फॉलो करत होते असे दिसून आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

केंद्रीय सुरक्षा यंत्रणांचे अधिकारी शाझिया वापरत असलेल्या इंटरनेट प्रोटोकॉल (आयपी) अ‍ॅड्रेसवर गेल्या अनेक महिन्यांपासून लक्ष ठेवून होते. शाझिया युवकांशी संभाषण करत असे आणि विशिष्ट ‘माल’ एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी पोहोचवल्यानंतरच त्यांना भेटण्याचे आश्वासन देत असे.

आणखी काही महिला दहशतवादी गटांसोबत असून त्यांना युवकांना भुलवून दहशतवादाकडे आणण्याचे काम देण्यात आले असल्याची माहिती शाझियाने चौकशीदरम्यान तपासकर्त्यांना दिली.

१७ नोव्हेंबरला शाझियाला अटक होण्याच्या एक आठवडा आधी, दहशतवादी श्रीनगरमध्ये शस्त्रे व दारूगोळा लपवून आणत असल्याची माहिती मिळाल्यानंतर जम्मू-काश्मीर पोलिसांनी आयसिया जान (२८) हिला श्रीनगरच्या सीमेवरील लावायपोरा भागात २० ग्रेनेड बाळगल्याबद्दल अटक केली होती. तिच्याजवळून दारूगोळाही जप्त करण्यात आला होता.

लष्कर-ए-तोयबाचा खोऱ्यातील दहशतवादी प्रमुख अबू इस्माईल आणि छोटा कासीम या दोघांना पोलिसांनी गेल्या सप्टेंबरमध्ये ठार केले होते. या प्रकरणाच्या तपासादरम्यानच आयसियावर पाळत ठेवण्यास सुरुवात झाली होती. गेल्या वर्षी आठ अमरनाथ यात्रेकरूंना ठार मारण्यात या दोघांचा सहभाग होता. उत्तर काश्मिरातील काही अज्ञात महिला या दोन दहशतवाद्यांना शस्त्रे व दारूगोळा पुरवत असल्याचे कळले होते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button