breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

तुमची ‘पवनाथडी’ तर आमची ‘इंद्रायणीथडी’

  • दोन्ही आमदारांच्या भांडणात पिंपरी-चिंचवडची वाटणी?
  • सांगवीत पवनाथडी तर आता भोसरीत होणार इंद्रायणीथडी

पिंपरी|आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने स्वतःची प्रतिमा निर्माण करण्यावर शहरातील दोन्ही आमदारांनी जोर दिला आहे. पवनाथडीचे निमित्त साधून भाजपचे आमदार लक्ष्मण जगताप यांनी बचत गटांच्या महिलांची एकजुट साधली. तशाच पध्दतीने आमदार महेश लांडगे यांनी देखील महिलांची मोट बांधण्यासाठी इंद्रायणीथडी भरविण्याचे नियोजन केले आहे. दोन्ही आमदारांच्या भांडणात शहराची वाटणी होऊन ‘तुमची पवनाथडी तर आमची इंद्रायणीथडी’ अशी स्पर्धा लागल्याची अनुभूती यातून येत आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने सांगवीतील ‘पीडब्युडी’ मैदानावर पवनाथडी घेण्यात आली. त्यामध्ये शहरातील 813 महिला बचत गटांच्या हजारो सदस्यांनी भाग घेतला होता. जत्रेतील स्टॉलला भेट देऊन चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप यांनी महिलांच्या समस्या जाणून घेतल्या. त्यांची एकजूट तयार करण्याच्या दृष्टीने वहिणी आश्विनी जगताप यांनी देखील महिलांशी संवाद साधला. या जत्रेनंतर जगतापांनी लागलीच अटल महाआरोग्य शिबिर घेऊन सर्वच क्षेत्रातील मतदारांशी संपर्क वाढविला. आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी स्वतःची प्रतिमा निर्मिती करण्यावर भर दिल्याचे यातून निदर्शनास येते. परंतु, यामध्ये सर्वच स्तरातील नागरिकांचे हीत साध्य झाल्याने अनेकांनी समाधान व्यक्त केले. जगतापांच्या या विधायक कार्याचे नागरिकांत कौतुक होत आहे.

आता भोसरीचे आमदार महेश लांडगे यांनी देखील पत्नी पूजा वहिणींच्या नेतृत्वाखाली महिला मंडळाची एकजूट बांधण्याच्या दृष्टीने इंद्रायणीथडीचे नियोजन केले आहे. महिला बचत गटांनी तयार केलेल्या वस्तुंना हक्काची बाजारपेठ उपलब्ध करून देण्याचा लांडगेंचा प्रयत्न आहे. या जत्रेच्या माध्यमातून लांडगे परिवार हजारो महिलांना एकत्रीत आणून त्यांच्याशी संवाद साधणार आहे. यातून आमदार लांडगेंची प्रतिमा निर्मिती होणार आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या आनुषंगाने त्यांना याचा फायदाच होणार आहे. त्यामुळे आमदार जगतापांच्या नंतर आता आमदार लांडगे यांनी देखील स्वतःच्या लोकप्रियतेसाठी जत्रा भरविण्याचे नियोजन केले आहे.

दोन्ही आमदारांत चढाओढ ?
लोकसभा आणि विधानसभा निवडणुका जवळ येऊ लागल्याने राजकीय नेत्यांच्या हालचाली वेगाने बदलू लागल्या आहेत. सर्वच पक्षाच्या नेत्यांनी नागरिकांचा संपर्क वाढविण्यावर भर दिला आहे. वेगवेगळ्या माध्यमातून किंवा उपक्रमांच्या आयोजनातून विविध स्तरातल्या लोकांशी संपर्क साधला जात आहे. पवनाथडी जत्रेच्या माध्यमातून आमदार जगतापांनी जे केले तेच आमदार लांडगे यांनी देखील करण्याचे नियोजन केले आहे. त्यामुळे ‘तुमची पवनाथडी तर आमची इंद्रायणीथडी’ अशा अविर्भावात कार्यकर्ते वावरू लागले आहेत. यावरून दोन्ही आमदारांनी पिंपरी-चिंचवडची वाटणी केली आहे की काय, असा प्रश्न राजकीय जाणकारांनी उपस्थित केला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button