breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

तिसऱ्या टप्प्यातील लोकसभा निवडणुकीसाठी प्रचाराच्या तोफा थंडावल्या

मुंबई – तिसऱ्या टप्प्यातील लोकसभा निवडणुकीसाठी प्रचाराच्या तोफा आज सायंकाळी थंडावल्या. 23 एप्रिलला होणाऱ्या या टप्प्यात महाराष्ट्रातील 14 जागांसाठी मतदान होईल. राज्यातील सर्वच प्रमुख पक्षांच्या नेत्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी प्रचार सभा घेत मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला. आता त्याला मतदार काय प्रतिसाद देतात हे 23 मे रोजी निकालावरुनच स्पष्ट होईल.

मागील काही काळात राज्यभरात निवडणूक प्रचाराचा धुरळा उडाला आहे. त्यात सत्ताधारी पक्षांसोबत सर्वच विरोधी पक्षांचाही समावेश होता. भाजपकडूनही पंतप्रधान मोदींसह भाजप अध्यक्ष अमित शाह आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही प्रचाराच्या रणधुमाळीत पूर्ण ताकदीने उतरले. रॅली, रोड शोसोबतच चौक सभा, घरोघरी भेटीगाठी याचाही प्रचारात वापर झाला. दुसरीकडे विरोधी पक्षांकडून काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह अनेक नेत्यांनी प्रचारात मेहनत घेतली. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर, एमआयएमचे नेते असदुद्दीन ओवैसी आदींनीही आपल्या प्रचार भाषणांतून मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला. यावेळी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरीही झडल्या.

मनसेने तर निवडणुकीत सहभाग नसतानाही महाराष्ट्रभर भाजपविरोधी आघाडी उघडली. त्यांच्या सभांमध्ये प्रचाराचा वेगळाच पॅटर्न पाहिला मिळाला. विरोधकांची जुनी आश्वासने आणि सध्याचे वास्तव यावर आधारित राज ठाकरेंच्या भाषणांनी भाजपला चांगलेच जेरीस आणले. तिसऱ्या टप्प्यासाठी 23 एप्रिलला मतदान होणार असून 23 मे रोजी या निवडणुकीचा निकाल लागणार आहे. या टप्प्यात 14 जागांवर मतदान होईल.

 

तिसऱ्या टप्प्यात ‘या’ ठिकाणी मतदान होणार

जळगाव, रावेर, जालना, औरंगाबाद, रायगड, पुणे, बारामती, अहमदनगर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी-सिंधुदुर्ग, कोल्हापूर, हातकणंगले

या टप्प्यातील लक्षवेधी लढती:

बारामती: सुप्रिया सुळे (राष्ट्रवादी काँग्रेस) विरुद्ध कांचन कुल (भाजप)

माढा : रणजितसिंह नाईक निंबाळकर (भाजप) विरुद्ध संजय शिंदे (राष्ट्रवादी)

अहमदनगर: सुजय विखे (भाजप) विरुद्ध संग्राम जगताप (राष्ट्रवादी काँग्रेस)

रायगड: अनंत गीते (शिवसेना) विरुद्ध सुनिल तटकरे (राष्ट्रवादी)

रत्नागिरी-सिंधुदुर्ग : विनायक राऊत (शिवसेना) विरुद्ध नवीनचंद्र बांदिवडेकर (काँग्रेस)

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button