breaking-newsआंतरराष्टीय

तितली वादळाने पश्चिम बंगाल, ओदिशात जोरदार पावसाची शक्यता

तितली वादळाची तीव्रता आता ओसरली असून ते ईशान्येकडे कमी दाबाच्या पट्टय़ाच्या रूपात सरकत चालले आहे. या वादळामुळे अजूनही पश्चिम बंगालमध्ये गंगेच्या प्रदेशात शनिवारी जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. ओडिशातून बाहेर पडून पश्चिम बंगालमध्ये गंगेच्या प्रदेशात आल्यानंतर त्याची तीव्रता आणखी कमी होणार असून, ओडिशातील गंजम जिल्हय़ात गोपालपूर येथे ते जमिनीला टेकले व नंतर ईशान्येकडे जाऊ लागले. पश्चिम बंगालमध्ये त्यामुळे उत्तर व दक्षिण २४ परगणा, पूर्व व पश्चिम मिदनापूर, झांग्राम, पूर्व वर्धमान, हावडा, हुगळी या जिल्हय़ात जोरदार पावसाची शक्यता आहे. कोलकाता, बांकुरा, पुरुलिया, बीरभूम, मुर्शिदाबाद, माल्दा, उत्तर व दक्षिण दिनाजपूर येथेही शनिवारी पावसाची शक्यता आहे. उत्तर व मध्य बंगाल उपसागर खवळलेला राहणार आहे. वादळाचा वेग ताशी ४५ ते ६५ कि.मी. असणार असून दिघा व आजूबाजूच्या रिसॉर्टवरील पर्यटकांना सुरक्षित ठिकाणी जाण्यास सांगण्यात आले आहे.

रेल्वेगाडय़ा रद्द

ओडिशात एकूण १६ रेल्वेगाडय़ा वादळामुळे रद्द कराव्या लागल्या किंवा त्यांच्या वेळा बदलाव्या लागल्या. तितली वादळामुळे ओडिशात मोठय़ा प्रमाणावर पाऊस झाला आहे. बेरहामपूर, पालसा भागात रेल्वेमार्गावर गुरुवारपासून पाणी असून ते हळूहळू ओसरत आहे. इच्छापूरम व झाडपुडी दरम्यानच्या पुलावर पाणी धोक्याच्या पातळीला टेकले होते. त्यामुळे अनेक रेल्वेगाडय़ा रद्द करण्यात आल्या.

वादळाची तीव्रता कमी झाली

तितली वादळाची तीव्रता ओडिशात कमी झाली असली तरी त्यामुळे मोठय़ा प्रमाणात हानी झाली आहे. राज्यात अनेक ठिकाणी वीजपुरवठा खंडित झाला असून, पुरामुळे रस्ते संपर्कही खंडित झाला आहे. असे विशेष पुनर्वसन आयुक्त बी. पी. सेठी यांनी सांगितले. आता या वादळाची तीव्रता कमी होऊन त्याचे कमी दाबाच्या पट्टय़ात रूपांतर झाले आहे. दक्षिण ओडिशातील नद्या वाहू लागल्या असून काही सखल भागात पाणी साठले आहे. ताशी दीडशे कि.मी. वेगाच्या वादळाने ओडिशाला तडाखा दिला. पूर्व भारतात गुरुवारी जोरदार पावसामुळे आंध्रात आठ तर ओडिशात १ जण ठार झाला. ओडिशात तीन लाख लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे. गंजम, गजपती, रायगडा, बालासोर जिल्हय़ात अनेक नद्या वाहत असून ऋषिकायला, वनसधारा, जलाका या नद्यांना पूर आला आहे.  साठलेले पाणी काढण्यासाठी भुवनेश्वर व कटक महापालिकेने पंपांचा वापर सुरू केला आ हे. बडागडा जराऊ नदीवरचा पूल पावसामुळे वाहून गेला. महेंद्रतनया नदीच्या पाण्यात गजपती जिल्हय़ाचा भाग बुडाला आहे. बालासोर, भद्रक, धेनकनाल जिल्हय़ात शनिवारी जोरदार पाऊस होण्याची शक्यता हवामान खात्याचे अधिकारी एच. आर. बिस्वास यांनी सांगितले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button