breaking-newsUncategorizedताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणे

‘तिखट भेळ चिखलीकरां’मध्ये गोडवा आणणार का?; रिंग उघड होताच महापाैर, विरोधी पक्षनेत्यांच्या दारी

  • संतपीठात भ्रष्टाचार, भोसरी रुग्णालय खासगीकरणावरुन ताणलेले संबंध जोडणार का?
  • भाजपच्या पारदर्शक कारभाराच्या चिंध्या, महासभेत पुन्हा वाजणार रिंग-रिंग
पिंपरी ( विकास शिंदे ) – पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत महापाैर राहूल जाधव आणि विरोधी पक्षनेते दत्ता साने हे चिखलीकर असले, तरीही एकमेकांचे पक्ष वेगवेगळे आहेत. मागील महासभेत दोघांमध्ये संतपीठ आणि भोसरी रुग्णालय खासगीकरण प्रस्तावावरुन त्याचे संबंध विळ्या-भोपळ्यासारखे झाले आहेत. त्यातच पारदर्शक कारभाराचा टेंभा मिरविणा-या भाजपच्या काळात स्थापत्य विभागातील कोट्यावधी रुपयाच्या कामात रिंग झाल्याचे पुराव्यानिशी उघड झाल्याने येत्या महासभेत पुन्हा रिंग-रिंग वाजणार आहे. दरम्यान, आज (बुधवारी) महापाैर राहूल जाधव यांनी विरोधी पक्षनेते दत्ता साने यांच्या दालनात विशेषता पत्रकारांसाठी चिखलीहून मागविलेल्या भेळचा आस्वाद घेताना दिसले. त्यामुळे तिखट भेट दोन्ही चिखलीकरांमध्ये गोडवा आणणार का? अशी चर्चा महापालिका वर्तुळात रंगली होती. 
पिंपरी-चिंचवड महापालिकेचे महापाैर राहूल जाधव यांना भाजपमधून महापाैर पद मिळाले, तर विरोधी पक्षनेते दत्ता साने यांना विरोधी पक्षनेते पद पदरात पडले. हे दोघेही शेवटी चिखलीकर आहेत. आज विरोधी पक्षनेत्यांनी पत्रकारांसाठी चिखलीहून प्रसिध्द भेळ मागविली होती. त्याच भेळचा आस्वाद घेण्यास महापाैर राहूल जाधव त्यांच्या दालनात हजर झाले. याप्रसंगी नगरसेवक राजू मिसाळ, मोरेश्वर भोंडवेही उपस्थित होते.
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या मागील सर्वसाधारण सभेत विरोधी पक्षनेत्यांनी टाळगाव चिखलीतील जगद्गुरु संत तुकाराम महाराजाच्या संतपीठ निविदा प्रक्रियेत कोट्यावधी रुपयाचा भष्टाचार सत्ताधारी भाजपने केल्याचा आरोप केला, तसेच भोसरी रुग्णालय खासगीकरणावरुन महासभेत प्रचंड गोंधळ झाला. काही काळ महासभा तहकूब करुन महापाैरांनी दादागिरी करत विषय मंजुर केले. त्याला राष्ट्रवादीचे दत्ता साने यांनी तेवढ्याच प्रखरतेने विरोध दर्शवून विरोध केला. तसेच सदरील प्रस्ताव महासभा कामकाजाला अनुसरुन मंजुर झालेले नसून पुन्हा महासभेत सादर करावेत, अशी मागणी आयुक्तांकडे केली. त्या महासभेवरुन महापाैर आणि विरोधी पक्षनेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप होवून संबंध ताणले होते.
तसेच 2014 मधील विधानसभा निवडणुकीत भोसरीचे आमदार महेश लांडगे यांच्या नारळ ग्रुपच्या प्रचाराची धुरा सांभाळणारे विद्यमान विरोधी पक्षनेते दत्ता साने आगामी 2019 मधील विधानसभा निवडणुकीस इच्छुक आहेत. त्यामुळे साने हे भोसरीतील प्रत्येक प्रस्तावावरुन लांडगे यांना टार्गेट करीत आहेत. मात्र, लांडगे हे महापाैर राहूल जाधव यांचे राजकीय दैवत आहेत. दैवतावर साने यांनी केलेल्या आरोपामुळे साने हे चिखलीकर असूनही महापाैर जाधव त्यांना महासभेतील त्याचा विरोध खोडून काढीत आहेत. त्यामुळे भोसरी विधानसभेवरुन हा आखाडा चांगलाच तापणार आहे.
दरम्यान, महापालिकेत विरोधी पक्षनेत्यांच्या दालनात चिखलीकरांची भेळ महापाैर-विरोधी पक्षनेत्यांनी त्याचा आस्वाद घेतला. मात्र, त्या चिखलीकराच्या भेळीवरुन भोसरीत राजकीय आखाडा तापणार असून ही तिखट भेळ महापाैर राहूल जाधव व विरोधी पक्षनेते दत्ता साने यांच्यात गोडवा आणणार का? अशी चर्चा महापालिका वर्तुळात सुरु होती.
Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button