breaking-newsमहाराष्ट्रमुंबई

तरुणांची रोजगारासाठी एसटीकडे धाव

,४१६ चालक तथा वाहक पदासाठी ५० हजार ४०० अर्ज; अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस

दुष्काळग्रस्त भागांतील तरुणांना रोजगार उपलब्ध व्हावा, यासाठी एसटी महामंडळाने चालक तथा वाहक पदाच्या ४ हजार ४१६ जागा भरण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार १७ जानेवारीपासून अर्ज स्वीकारण्यास सुरुवात करताच आतापर्यंत ५० हजार ४०० अर्ज प्राप्त झाले आहेत. ८ फेब्रुवारीपर्यंत अर्ज भरण्याची शेवटची मुदत आहे. दुष्काळग्रस्त भागातूनच नाही तर राज्यातील अन्य भागांतूनही चालक तथा वाहक पदासाठी अर्ज करण्यात आले आहेत.

राज्यात १५ जिल्ह्य़ांमध्ये दुष्काळ आहे. या जिल्ह्य़ांमधील युवक-युवतींना रोजगार मिळावा यासाठी एसटी महामंडळाच्या वतीने चालक तथा वाहक पदाची संधी उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला. औरंगाबाद, बीड, जालना, लातूर, नांदेड, उस्मानाबाद, परभणी, अमरावती, अकोला, बुलढाणा, यवतमाळ, धुळे, जळगाव, नाशिक व पुणे या पंधरा जिल्ह्य़ांमध्ये दुष्काळ आहे. मात्र बीड, लातूर, उस्मानाबाद, नांदेड या जिल्ह्य़ात चालक तथा वाहक पदाच्या रिक्त जागा नाहीत. त्यामुळे उर्वरित ११ जिल्ह्य़ांसाठी ४ हजार ४१६ पदे भरण्याची घोषणा एसटीने केली. यासाठी ऑनलाइन अर्ज नोंदणीला १७ जानेवारीपासून सुरुवात केली. ८ फेब्रुवारीपर्यंत अर्जाची अंतिम मुदत आहे.

आतापर्यंत ५० हजार ४०० अर्ज आले आहेत. या पदांसाठी अर्ज कुणीही करू शकतो. दुष्काळग्रस्त भागांतील युवकांना भरतीत प्राधान्य असल्याचे सूत्रांनी सांगितले. परंतु दुष्काळग्रस्त भागाबरोबरच राज्यातील अन्य भागांतूनही अर्ज आले आहेत. या पदांसाठी भरती प्रक्रिया शुल्क भरणे आवश्यक आहे आणि खुल्या प्रवर्गाकरिता ६०० रुपये, मागास प्रवर्गातील उमेदवार तसेच महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त भागांतील उमेदवारांना ३०० रुपये असे शुल्क आकारण्यात आले आहे. याशिवाय बँकेचे अन्य शुल्क आकारणीही उमेदवार स्वत:च भरणार आहेत. असे असतानाही उमेदवारांनी मोठय़ा प्रमाणात अर्ज महामंडळाकडे केल्याची माहिती एसटीतील सूत्रांनी दिली.

महिलांकडून मात्र अल्प प्रतिसाद

चालक तथा वाहक पदाच्या एकूण ४,४१६ जागा भरल्या जाणार असल्या तरी यात ३० टक्के महिलांसाठी आरक्षण आहे. याचाच अर्थ १,३२४ जागा महिलांसाठी राखीव आहेत. मात्र आलेल्या ५० हजार ४०० अर्जामध्ये केवळ २५० महिलांचे अर्ज आहेत. हे पाहता महिलांकडून अत्यल्प प्रतिसाद मिळाला आहे. तर ५० हजार १५० अर्ज हे पुरुषांकडून करण्यात आले आहेत.

दहावी उत्तीर्ण, सर्व प्रकारची अवजड वाहने विशेषत: डिझेलवरील अवजड वाहने चालवण्याचा किमान तीन वर्षांचा विना अपघात अनुभव, उमेदवाराचे वय २४ वर्षांपेक्षा कमी व ३८ पेक्षा जास्त नसावे, असेही एसटी महामंडळाने घातलेल्या अटींमध्ये नमूद आहे. चालक तथा वाहक पदासाठी अर्ज केलेल्या उमेदवारांची निवड झाल्यास त्यांना  १२ हजार ०८० पासून वेतन मिळण्यास सुरुवात होईल. दरवर्षी त्यांच्या वेतनात वाढ होणार असून हे वेतन २६ हजार ६७३ रुपयांपर्यंत वाढेल.

बीड, लातूर, उस्मानाबाद आणि नांदेड जिल्ह्य़ात वाहक पदाच्या रिक्त जागा नाहीत. त्यामुळे या जिल्ह्य़ातील युवकांच्या हाताला काम देण्यासाठी पात्र उमेदवारांची निवड केली जाईल. त्यांना ज्या जिल्ह्य़ात जागा रिक्त आहेत तेथे नियुक्त्या दिल्या जाणार असून त्याचीही प्रक्रिया सुरू आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button