breaking-newsमुंबई

डेबिट-क्रेडिट कार्डद्वारे लोकलचे तिकीट

खिडक्यांसमोरील रांगेतून सुटका करण्यासाठी एटीव्हीएम प्रवाशांच्या सेवेत आणल्या नंतर आता मध्य रेल्वेवर डेबिट-क्रेडिट कार्डद्वारेही लोकलचे तिकीट मिळणार आहे. त्यामुळे एटीव्हीएममधून तिकीट घेण्यासाठी स्वतंत्र स्मार्ट कार्डची गरज भासणार नाही. डेबिट-क्रेडिट कार्डद्वारे तिकीट देण्यासाठी एटीव्हीएमलाच पीओएस (पॉइंट ऑफ सेल) यंत्र लावण्यात येणार असून त्यासाठी संबंधित कंपनीशी चर्चा होत असल्याचे रेल्वेतील वरिष्ठ अधिकाऱ्याकडून सांगण्यात आले.

प्रवाशांना लोकलचे झटपट तिकीट उपलब्ध व्हावे यासाठी काही वर्षांपूर्वी रेल्वे स्थानकात एटीव्हीएम लावण्यात आले. त्यासाठी स्मार्ट कार्ड देखील उपलब्ध करण्यात आले. या यंत्रावर कार्ड ठेवताच व अन्य प्रक्रिया पार पाडून प्रवाशांना तिकीट मिळते. मध्य रेल्वेवर ६०० पेक्षा जास्त एटीव्हीएम असून यातून अडीच ते तीन लाख तिकिटांची विक्री होते. परंतु सध्या  सर्वाकडे डेबिट-क्रेडिट कार्ड असते. प्रत्येक प्रवाशाकडे एटीव्हीएमचे स्मार्ट कार्ड असतेच असे नाही. त्यामुळे एटीव्हीएम मशीनवर डेबिट-क्रेडिट कार्डचा वापर करून झटपट तिकीट उपलब्ध करता येऊ शकते का याची चाचपणी रेल्वेच्या ‘क्रिस’ने (सेंटर फॉर रेल्वे इन्फॉर्मेशन सिस्टीम) करण्यास सुरुवात केली.

चाचणी यशस्वी झाल्यानंतर पश्चिम व मध्य रेल्वेला चाचणी करण्यास सांगितले. आता मध्य रेल्वेने अंमलबजावणीसाठी पुढाकारही घेतला आहे. तर पश्चिम रेल्वेकडून यावर विचारविनिमय केला जात आहे. मध्य रेल्वेवर ६०० पेक्षा जास्त एटीव्हीएम असले तरी सुरुवातीला ज्या स्थानकांत गर्दीचे जास्त आहे, अशा स्थानकांतील एटीव्हीएमवरच किंवा प्रत्येक स्थानकातील दोन ते तीन एटीव्हीएमवर ही सुविधा देण्याचे नियोजन केले जात आहे. त्यासाठी एटीव्हीएमवरच डेबिट-क्रेडिट कार्ड स्वाईप करणारे पीओएस मशीन बसवण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. ही सुविधा देण्यासाठी संबंधित कंपनीने पीओएस मशीन बसवण्यासाठी जास्त रक्कम मागितली आहे. त्यामुळे यावर चर्चा केली जात असून लवकरच ही सुविधा उपलब्ध केली जाणार असल्याचे स्पष्टही केले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button