breaking-newsपुणेमहाराष्ट्र

टेमघर धरण यंदा 80 टक्के भरणार

दुरुस्तीचा पहिला टप्पा पूर्ण : एकूण क्षमता 3.76 टीएमसी

          गळतीनंतर दीड वर्षांपासून सुरू आहे दुरुस्ती

पुणे – शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांपैकी एक असलेल्या टेमघर धरण दुरुस्तीचे काम सुरू आहे. यामुळे टेमघर धरण पूर्ण क्षमतेने भरले जात नव्हते. मागील वर्षी धरण 60 टक्केच भरण्यात आले. यंदा मात्र पाणी साठविण्याच्या पातळीत वाढ केली जाणार असून 700 मीटर पातळीपर्यंत म्हणजे 80 टक्के धरण भरले जाणार आहे.

टेमघर धरणातून मोठ्या प्रमाणावर गळती होत होती. धरणाच्या भितींमधून धबधब्याप्रमाणे पाणी वाहत होते. त्यामुळे धरणाच्या सुरक्षितेलाच धोका निर्माण झाला होता. गळतीबाबत उपाययोजना केली नाही; तर धरणांचे आयुष्य कमी होते, याकडे जलसंपदा विभागाचे दुर्लक्ष केले. त्यानंतर टेमघर धरणातून गळती वाढल्याचा मुद्दा गाजल्यानंतर जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी टेमघर धरणाची पाहणी केली. त्यानंतर ऑगस्ट 2016 मध्ये धरण दुरुस्तीचा निर्णय जलसंपदा विभागाने घेतला.

पाणी गळती रोखण्यासाठी जलसंपदा विभागाकडून 100 कोटींचा निधीही मंजूर करण्यात आला. मागील दीड वर्षांपासून धरण दुरुस्ती सुरू आहे. धरणात पाणी असताना हे काम करणे शक्‍य होत नाही. त्यामुळे सर्वात आधी टेमघर धरणातील पाणी खडकवासला धरणात सोडून देण्यात देण्यात आले. त्यानंतर दुरुस्तीचे काम वेगाने सुरू करण्यात आले. मागील वर्षी धरणात 695 मीटर उंचीपर्यंत पाणी साठविण्यात आले. त्यामुळे धरणात फक्त 60 टक्केच पाणीसाठा उपलब्ध होता. आता मात्र धरण दुरुस्तीचा पहिला टप्पा पूर्ण झाला असून दुसऱ्या टप्प्यातील काम अंतिम टप्प्यात आले आहे. त्यामुळे यंदा पाणीसाठ्यात वाढ करण्यात येणार असून 80 टक्‍यांपर्यंत धरण भरण्यात येणार असल्याची माहिती जलसंपदा विभागातील अधिकाऱ्यांनी दिली.

टेमघर धरण उभारताना गुणवत्ता राखली गेली नाही तसेच तांत्रिक उणिवाही राहून गेल्या. यामुळे धरणातूम मोठ्या प्रमाणावर गळती सुरूच राहिली. प्रति सेंकद काही हजार लिटर पाणी वाहत होते. टेमघर धरणाची एकूण क्षमता 3.76 टीएमसी एवढी आहे. मात्र धरणाच्या गळतीमुळे पूर्ण क्षमतेने धरण भरले जात नसल्याची माहिती सूत्रांनी दिली.

गळतीमुळे टेमघर धरणाला धोका वाटत होता. त्यामुळे प्राधान्याने धरण दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले. सध्या हे काम वेगाने सुरू आहे. दर आठ दिवसांनी कामाचा आढावा घेतला जात आहे. यावर्षी धरण दुरुस्तीचे काम 80 टक्के पूर्ण होईल.
– गिरीश महाजन, जलसंपदा मंत्री, महाराष्ट्र राज्य.
Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button