breaking-newsक्रिडा

टेनिस : अंकीता रैनाची दुहेरी वाटचाल

जकार्ता : भारताचे आशास्थान अंकिता रैना हिने महिला एकेरी व दुहेरी या दोन्ही विभागात उपांत्यपूर्व फेरी गाठत आशा कायम राखल्या. पुरुषांच्या दुहेरीत भारताच्या दोन्ही जोडय़ांनी आगेकूच कायम ठेवली.

अंकीताने एकेरीत जपानच्या ईरी होझुमी हिचा ६-१, ६-२ असा दणदणीत पराभव केला. उपांत्यपूर्व फेरीत तिच्यापुढे हाँगकाँगच्या चोंग उडीस वोंग हिचे आव्हान असणार आहे. भारताच्या कामरान कौर थांडी हिला चीन तैपेईची खेळाडू लियांग एनशुओ हिने २-६, ६-४, ७-६ (७-४) असे चुरशीच्या लढतीनंतर पराभूत केले. दुहेरीत अंकिताने पुण्याच्या प्रार्थना ठोंबरे हिच्या साथीत पाकिस्तानच्या सराह खान व सुहेल उशाना यांची ६-०, ६-० अशी धूळधाण उडविली. त्यांना पुढच्या फेरीत गोझाल ऐनिनोवा व अ‍ॅना डॅनिलिना यांच्याशी खेळावे लागणार आहे. दुहेरीतील अन्य लढतीत भारताच्या ऋतुजा भोसले व प्रांजला येडलापल्ली यांना पराभवास सामोरे जावे लागले. त्यांना निचा लेर्तपितास्किन व प्लीपुच पिंगतर्न यांनी ३-६, ६-४, ११-९ असे संघर्षपूर्ण लढतीनंतर पराभूत केले. कामरान हिला मिश्रदुहेरीत दिविज शरण याच्या साथीत हार मानावी लागली. त्यांना अ‍ॅना व नेदोविसोव अ‍ॅलेक्झांडर यांनी ६-४, ३-६, १०-५ असे हरविले.

पुरुषांच्या दुहेरीत सुमीत नागल व रामकुमार रामनाथन यांनी चीन तैपेईच्या पेंग हेसिनीन व चेन तेई यांचे आव्हान ७-६ (७-५), ७-६ (७-२) असे चिवट लढतीनंतर संपुष्टात आणले. उपांत्य फेरीत स्थान मिळविण्यासाठी त्यांना बुबलिक अ‍ॅलेक्झांडर व येवेसेयेव डेनिस यांचे आव्हान पार करावे लागणार आहे. विजेतेपदाचे दावेदार असलेल्या रोहन बोपण्णा व दिविज यांनीही अपराजित्व राखले. त्यांनी नुतानोन काडचापन व विशाया त्रोंगचारोंच यांचा ६-३, ६-१ असा दणदणीत पराभव केला. त्यांची चीन तैपेईच्या हेसिह चेंगसेंग व यांगत्सुंग हुआ यांच्याशी गाठ पडणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button