breaking-newsक्रिडा

टीका करणे सोपे असते!

भारताचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांचे प्रत्युत्तर

लक्षावधी मैलांच्या अंतरावरून टीका करणे सोपे असते, अशा शब्दांत भारताचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी कोणाचेही नाव न घेता टीकाकारांना चोख उत्तर दिले.

पर्थच्या दुसऱ्या कसोटीत भारताने १४६ धावांनी पराभव पत्करल्यानंतर माजी कर्णधार सुनील गावस्कर यांच्यासह अनेक माजी क्रिकेटपटूंनी टीका केली. गावस्कर यांनी संघ व्यवस्थापनाची निवड प्रक्रिया तसेच कर्णधार विराट कोहली आणि शास्त्री यांच्या कामगिरीचे विश्लेषण करण्याची आवश्यकता असल्याचे मत प्रकट केले होते.

‘‘जेव्हा तुम्ही लक्षावधी मैलांवर असता, तेव्हा कोणत्याही विषयावर भाष्य करणे फारसे कठीण नसते. संघाच्या विजयासाठी आवश्यक असलेल्या सर्व गोष्टी आम्ही करीत आहोत,’’ अशी ग्वाही शास्त्री यांनी दिली.

दुसऱ्या कसोटीत रवींद्र जडेजा आणि इशांत शर्मा यांच्यातील वादाबाबत शास्त्री म्हणाले, ‘‘हा वाद माझ्यासाठी मुळीच आश्चर्यकारक नव्हता. त्यामुळे संघात एकोपा निर्माण होण्यास मदत होते, अशी माझी धारणा आहे.’’

विराट कोहलीच्या मैदानावरील वर्तणुकीबाबत ऑस्ट्रेलियाच्या नामांकित क्रिकेटपटूंनी टीका केली. त्यावर अपेक्षेप्रमाणेच शास्त्री यांनी कोहलीची पाठराखण केली. ते म्हणाले, ‘‘कोहली एक अप्रतिम खेळाडू आहे. मग त्याच्या वर्तणुकीत काय चुकीचे आहे? हो, तुम्ही सवाल नक्की करू शकता; पण आमच्या दृष्टीने तो एक उत्तम व्यक्ती आहे.’’

दोन्ही कसोटी सामन्यांत लोकेश राहुल आणि मुरली विजय हे सलामीवीर अपयशी ठरले. त्यामुळे आघाडीच्या फळीची चिंता भारताला तीव्रतेने भेडसावत आहे. मात्र आपल्या अनुभवाच्या बळावर हे दोघे त्यावर मात करतील, असा विश्वास शास्त्री यांनी व्यक्त केला.

मयांक अगरवालच्या पर्यायाबाबत संघ व्यवस्थापन गांभीर्याने पाहात आहे, असे संकेत शास्त्री यांनी दिले. ते म्हणाले, ‘‘मयांक हा युवा खेळाडू अतिशय चांगली कामगिरी करीत आहे. भारत-अ संघासाठी त्याने सातत्याने धावा केल्या आहेत. देशांतर्गत क्रिकेटमधील त्याची कामगिरी अन्य खेळाडूंपेक्षा वाखाणण्याजोगी आहे. त्यामुळेच मयांक सलामीसाठी उत्तम पर्याय ठरू शकेल.’’

..पण आत्मविश्वास गमावलेला नाही!

पर्थच्या अपयशानंतर संघाने आत्मविश्वास गमावला आहे का, या प्रश्नाला उत्तर देताना शास्त्री म्हणाले, ‘‘पर्थमध्ये आम्ही सामना गमावला, परंतु आत्मविश्वास गमावलेला नाही. परदेशातील कसोटी मालिकेत १-१ अशी समाधानकारक स्थिती आहे. ही स्थिती दक्षिण आफ्रिका किंवा इंग्लंडमध्येही अनुभवली नव्हती. त्यामुळे आपल्या क्षमतेनुसार उर्वरित मालिकेत आम्ही यश मिळवू, याबाबत खेळाडू आशावादी आहेत.

जडेजाची दुखापत भारतामधीलच!

अनुभवी फिरकी गोलंदाज रवींद्र जडेजाच्या खांद्याची दुखापत ही देशात रणजी क्रिकेट सामन्यात झाली होती. मात्र ऑस्ट्रेलियात दाखल झाल्यानंतर चार दिवसांनी त्याने त्यावर उपचार घेण्यास प्रारंभ केला, अशी माहिती शास्त्री यांनी दिली.पर्थच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात १३ खेळाडूंमध्ये जडेजाला स्थान दिल्यानंतर त्याच्या तंदुरुस्तीबाबत शंका घेण्यात आली. याबाबत शास्त्री म्हणाले, ‘‘रणजी सामन्यांत खांद्याला दुखापत झाल्यावरही तो उपचार घेऊन खेळत राहिला. ऑस्ट्रेलियात आल्यावर चार दिवसांनी त्याने इंजेक्शन घेतले. त्याला दुखापतीतून सावरण्यासाठी आणखी काही काळ लागेल.’’

एमसीजीवरील गवतामुळे मनास भुरळ पडू देऊ नका – हॅरिस

मेलबर्न : तिसऱ्या कसोटीसाठी मेलबर्न स्टेडियमवर हिरवी खेळपट्टी बनवण्यात आली असली तरी यामुळे फलंदाजांनी घाबरून न जाता संयमाने फलंदाजी केल्यास नक्कीच यश मिळेल, अशी प्रतिक्रिया ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर मार्कस हॅरिसने व्यक्त केली. ‘‘मेलबर्नची खेळपट्टी गोलंदाजांना मोह घालणारी असून येथे सामना किमान दीड ते दोन दिवसांत संपेल असे वाटते. मात्र प्रत्यक्षात तसे नसून येथे चेंडूला कमी उंची मिळते व फलंदाजांनादेखील ती तितकीच पोषक ठरू शकते,’’ असे हॅरिस म्हणाला.

पर्थबाबतचा शेरा निराशाजनक – स्टार्क

मेलबर्न : पर्थच्या ऑप्टस स्टेडियमवरील खेळपट्टीबाबत आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) दिलेला ‘सामान्य’ दर्जाची खेळपट्टी हा शेरा निराशाजनक आहे, अशी प्रतिक्रिया ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कने व्यक्त केली. ‘‘पर्थच्या खेळपट्टीबाबतचा शेरा एक क्रिकेटचाहता म्हणून दु:ख देणारा आहे. कसोटी क्रिकेटसाठी आवश्यक बॅट आणि बॉलचा अप्रतिम संघर्ष दुसऱ्या कसोटीत पाहायला मिळाला,’’ असे स्टार्कने सांगितले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button