breaking-newsमनोरंजन

‘जैत रे जैत’ चित्रपट आणि मुक्ता बर्वे यांना स्मिता पाटील स्मृती पुरस्कार

आपल्या सशक्त अभिनयाने हिंदी सिनेसृष्टी गाजवणाऱ्या, तरल आणि संवेदनशील अभिनयाचा आविष्कार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अभिनेत्री स्मिता पाटील यांच्या नावाने पुरस्कार दिले जातात. त्यांच्या ३२व्या पुण्यतिथी दिनाच्या निमित्ताने दुसरा ‘स्वर्गीय स्मिता पाटिल स्मृती पुरस्कार २०१८’ जाहीर करण्यात आलेला आहे. यामध्ये नुकत्याच ४० वर्ष पूर्ण केलेल्या ‘जैत रे जैत’ या चित्रपटाला तसेच ‘स्वर्गीय स्मिता पाटील कौतुक पुरस्कार २०१८’ हा नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘मुंबई पुणे मुंबई-३’ या चित्रपटाची अभिनेत्री मुक्ता बर्वे यांना प्रदान करण्यात येणार आहे.

शनिवार, दिनांक १५ डिसेंबर २०१८ रोजी रात्री ८:३० वाजता विलेपार्ले येथील दीनानाथ मंगेशकर नाट्यगृहात होणाऱ्या या पुरस्कार सोहळ्यात ‘जैत रे जैत’ चित्रपटाचे दिग्दर्शक जब्बार पटेल, चित्रपटाचे संगीतकार हृदयनाथ मंगेशकर, चित्रपटाची निर्माती उषा मंगेशकर आणि चित्रपटात काम केलेले अभिनेते मोहन आगाशे या मान्यवरांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या हस्ते हे पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत. या पुरस्कार वितरण सोहळ्यामध्ये स्मिता पाटील यांच्या गाजलेल्या ‘जैत रे जैत’ आणि ‘उंबरठा’ चित्रपटांविषयी या सर्व मान्यवरांमध्ये परिसंवाद रंगणार आहे.

या पुरस्कार वितरण सोहळ्याचे सूत्रसंचालन स्मिता गवाणकर करणार असून पुरस्कार वितरण सोहळ्यानंतर स्मिताच्या स्मृतीखातर जीवनगाणीने खास निर्माण केलेला मूर्तीमंत ‘अस्मिता’ हा रसिकमान्य कार्यक्रम सादर केला जाईल. अर्चना गोरे, सोनाली कर्णिक आणि मंदार आपटे हे गायक कलाकार स्मिता पाटील यांच्या गाजलेल्या ‘जैत रे जैत’ आणि ‘उंबरठा’ या दोन चित्रपटातील गाणी सादर करणार आहेत. याला संगीत संयोजन आनंद सहस्रबुद्धे यांचे असणार आहे. स्मिता पाटील या प्रतिभावंत अभिनेत्रीला पद्मश्रीसहीत अनेक पुरस्कारांनी सन्मानित केले गेले.

रुपेरी पडद्यावर भारतीय स्त्रीची पर्यायी प्रतिमा साकारणारी सक्षम अभिनेत्री म्हणून स्मिता पाटील यांचे चित्रपटसृष्टीच्या इतिहासात वेगळं स्थान आहे. स्मिता पाटील यांचा जन्म १७ ऑक्टोबर १९५५ रोजी झाला. अल्पायुषी ठरलेल्या स्मिता पाटील यांनी विविध व्यक्तिरेखांच्या संवेदना व त्यांचं व्यक्तिमत्व इतक्या प्रभावीपणे आणि सूक्ष्म बारकाव्यांसह अभिव्यक्त केलं की त्यामुळे पडद्यावरील सौंदर्याच्या रुढ संकल्पना दुय्यम ठरल्या. वेगळया मूल्यचौकटी व निष्ठा घेऊन जगणाऱ्या अशा व्यक्तिरेखांना या अभिनेत्रींनी एका अर्थाने मान्यताच मिळवून दिली. स्मिता पाटील यांचे १३ डिसेंबर १९८६ रोजी निधन झालं.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button