breaking-newsक्रिडा

जाणून घ्या भारताच्या विजयामागची ५ कारणं

आशिया चषकात साखळी सामन्यात पाकिस्तानवर मात केल्यानंतर, भारताने Super 4 गटातील सामन्यात पुन्हा एकदा पाकिस्तानला धूळ चारली. ९ गडी राखून विजय मिळवत भारतीय संघ आशिया चषकाच्या अंतिम फेरीत दाखल झाला आहे. शिखर धवन आणि रोहित शर्माने झळकावलेली शतकं आणि गोलंदाजीत जसप्रीत बुमराहने अखेरच्या षटकांमध्ये केलेला भेदर मारा ही भारताच्या विजयाची प्रमुख वैशिष्ट्य ठरली. रविवारी झालेल्या सामन्यात भारताने पाकिस्तानवर मिळवलेल्या विजयाची ५ महत्वाची कारणं देता येतील.

१) भारतीय गोलंदाजांचा शिस्तबद्ध मारा –

सुरुवातीच्या षटकांमध्ये जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमारने पाकिस्तानी गोलंदाजांना हात मोकळे करण्याची संधीच दिली नाही. यानंतर कुलदीप, चहल आणि बुमराहने पाकच्या पहिल्या ३ फलंदाजांना झटपट माघारी धाडलं. यामुळे सुरुवातीच्या षटकांमध्ये पाकिस्तानचे फलंदाज मोठी भागीदारी रचू शकले नाहीत.

२) अखेरच्या षटकांमध्ये बुमरा-चहलची भेदक गोलंदाजी –

पहिले ३ फलंदाज माघारी परतल्यानंतर शोएब मलिक आणि कर्णधार सरफराज अहमद यांनी भागीदारी रचत संघाचा डाव सावरला. शोएब मलिक माघारी परतल्यानंतर मधल्या फळीतल्या फलंदाजांनी फटकेबाजी करत पाकिस्तानला २०० धावांचा टप्पा ओलांडून दिला. मात्र चहल आणि बुमराह यांनी अखेरच्या षटकांमध्ये टिच्चून मारा करत पाकिस्तानी फलंदाजांना वेसण घातली. महत्वाची गोष्ट म्हणजे बुमराहने अखेरच्या षटकांमध्ये यॉर्कर चेंडू टाकण्यावर भर देत पाकिस्तानी फलंदाजांना मोठे फटके खेळण्याची संधीच दिली नाही.

३) रोहित शर्माचं चतुरस्त्र नेतृत्व –

रोहित शर्माने कालच्या सामन्यात आपल्या कुशल नेतृत्वाची चुणूक दाखवून दिली. सुरुवातीच्या षटकांमध्ये पाकिस्तानची सलामीची जोडी आपला जम बसवत असल्याचं पाहताच रोहितने लगेचच चहल-कुलदीप जोडीला गोलंदाजीसाठी आणलं. यानंतर काही मिनीटांमध्येच पाकची सलामीची जोडी फुटली. अखेरच्या षटकांमध्येही भुवनेश्वर कुमारच्या एका षटकात २२ धावा कुटल्या गेल्या. यावेळी रोहितने वेळेतच बुमराहच्या हाती चेंडू सोपवत पाकिस्तानला मोठी धावसंख्या उभारण्यापासून रोखलं. कालच्या सामन्यात समालोचकांनीही रोहितच्या नेतृत्वगुणांचं कौतुक केलं.

४) पाकचा बचावात्मक पवित्रा आणि ढिसाळ क्षेत्ररक्षण –

फलंदाजीदरम्यान अखेरच्या षटकांमध्ये कोणताही संघ जास्तीत जास्त धावा जमवण्याचा प्रयत्न करतो. मात्र पाकच्या फलंदाजांनी याच षटकांमध्ये बचावात्मक पवित्रा घेतला. यानंतर गोलंदाजीदरम्यान पाकिस्तानी क्षेत्ररक्षकांनी ढिसाळ कामगिरी केली. शादाब खानने तब्बल ३ वेळा रोहित शर्माचा झेल टाकला. याशिवाय फखार झमान आणि इमाम उल हक यांनीही सोपे झेल सोडले.

५) भारतीय सलामीच्या फलंदाजांची धडाकेबाज कामगिरी –

रोहित शर्मा आणि शिखर धवन या भारताच्या सलामीच्या फलंदाजांनी पाकिस्तानी गोलंदाजांच्या अक्षरशः नाकीनऊ आणले. दोन्ही फलंदाजांनी सामन्यात शतकी खेळीची नोंद केली. त्याचसोबत पहिल्या विकेटसाठी झालेल्या द्विशतकी भागीदारीमुळे पाकिस्तानी संघ सामन्यात पुनरागमन करुच शकला नाही.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button