पिंपरी / चिंचवड

जांबेतील वीटभट्टी कामगाराला झालेल्या मारहाण प्रकरणाची सखोल चौकशी करा

  •  अमित गोरखे यांची पोलीस आयुक्तांकडे मागणी

पिंपरी, (महा-ई-न्यूज) – जांबे, मुळशीतील वीटभट्टीवर काम करणारे मातंग समाजातील सुनील पौळ यांना मालकाने मानवी विष्ठा खाण्यास भाग पाडून मानव जातीला काळीमा फासणारे कृत्य केले आहे. या घडलेल्या अघोरी प्रकरणाचा सखोल आणि योग्य पद्धतीने तपास करावा. आरोपींना कडक शिक्षा करावी, अशी मागणी भाजप प्रदेश सदस्य अमित गोरखे यांनी पोलीस आयुक्तांकडे केली आहे.

गोरखे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने पोलीस आयुक्त आर. के. पद्मनाभन, अप्पर आयुक्त मकरंद रानडे यांची बुधवारी (दि.20) भेट घेऊन आरोपींवर कडक कारवाई करण्याची मागणी केली. या शिष्टमंडळात बापू घोलप, मनोज तोरडमोल, दीपक चखाले, सागर गायकवाड, अमोल कुचेकर, सचिन कुचेकर, रमेश शिंदे, बाळासाहेब शिंदे, अनिल गाडे, मयूर लोंढे, जयवंत गायकवाड, सचिन अडागळे, अविनाश शिंदे, राजू आवळे, बापू पाटोळे, मनोज मातंग, दिनकर तेलंग, श्रीकांत कांबळे सहभागी झाले होते.

मुळशी, जांबे येथील वीटभट्टी मालक संदीप पवार याने 13  मार्च 2019 रोजी वीटभट्टीवर मजूर म्हणून काम करणारे मातंग समाजातील सुनील पौळ (मूळगाव पाथ्रुड, ता. भूम, जिल्हा उस्मानाबाद) यांच्या कुटुंबास अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करत मारहाण केली. तसेच सुनील पौळ यांना मानवी विष्ठा खाण्यास भाग पाडले. त्यांच्या आईबद्दल अपशब्द वापरुन कुटुंबाचे अतोनात हाल केले आहेत.

आरोपी संदीप पवार हा धनदांडगा असून त्याच्याकडून पौळ कुटुंबियांवर दहशत करुन हे प्रकरण दडपण्याचे प्रयत्न करण्याची शक्यता आहे. त्यामुळे या प्रकरणाचा सखोल तपास करावा. सत्य परिस्थिती, वस्तुजन्य पुरावा इत्यादी माहिती घेऊन आरोपीला कठोर शिक्षा करावी. भविष्यात अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी आपण स्वत: लक्ष देऊन तपास करावा, अशी मागणी गोरखे यांनी केली आहे.

अमित गोरखे म्हणाले, ”आपल्या उदरनिर्वाहासाठी उस्मानाबाद जिल्ह्यातून पौळ कुटुंब हे जांबे येथे आले आहेत. वीटभट्टीवर ते काम करतात. 13 मार्च रोजी  वीटभट्टी मालक संदीप पवार याने सुनील पौळ यांना मानवी विष्ठा खाण्यास भाग पाडले. असले अघोरी कृत्य केले आहे. वीटभट्टी मालकाने केलेले हे कृत्य अखिल मानव जातीला काळिमा फासणारे आहे. मातंग समाजातील नागरिकाला अशी हीन वागणूक देणे अतिशय निंदनीय आहे. अशा विकृत प्रवृत्तींना जरब बसेल असे कठोर शासन करण्यात यावे. अन्यथा मातंग समाज आक्रमक होईल. वेळप्रसंगी रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही”

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button