breaking-newsआंतरराष्टीय

चर्चा पुरे, आता पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्याच: अमरिंदर सिंग

जम्मू- काश्मीरमधील पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्याचा पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी निषेध केला आहे. पाकिस्तानी सैन्य आणि आयएसआयला चोख प्रत्युत्तर द्याच, अशी मागणी अमरिंदर सिंग यांनी केंद्र सरकारकडे केली आहे.

पुलवामा येथे जैश- ए- मोहम्मदच्या दहशतवाद्याने घडवलेल्या आत्मघाती स्फोटात ३९ जवान शहीद झाले. या हल्ल्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली आहे. पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांनी देखील कठोर शब्दात या हल्ल्याचा निषेध केला आहे. ते म्हणाले, आता शांततेसाठी पाकिस्तानसोबत चर्चा करण्याचे दिवस संपले. आता पाकिस्तानला धडा शिकवण्याची वेळ आली आहे. केंद्र सरकारलाही याची जाणीव असेल, अशी आशा आहे. आता खूप झाले, आपल्या जवानांनी दिलेले बलिदान व्यर्थ जाऊ नये, असे त्यांनी सांगितले.

पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल बाजवा आणि पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांना देखील अमरिंदर सिंग यांनी खडेबोल सुनावले आहे. पाकिस्तानी सैन्य आणि आयएसआय या गुप्तचर यंत्रणेने काश्मीर आणि पंजाबमधील फुटिरतावाद्यांना पाठबळ देणे थांबवावे, असे त्यांनी म्हटले आहे. आमच्याकडे ८१ हजार जवानांची सुसज्ज फौज आहे. आता पाक सैन्य व गुप्तचर यंत्रणेने पंजाबमध्ये दहशतवादी कारवाया करण्याचा प्रयत्न केला तर आम्ही त्यांना चोख प्रत्युत्तर देऊ. हे १९८० चे दशक नाही. पंजाब पोलिसांकडे अत्याधुनिक शस्त्र आहेत, असे त्यांनी सांगितले. इम्रान खान यांना आयएसआयना पंतप्रधानपदी बसवले असून ते आयएसआयसाठीच काम करत आहेत, असा आरोप त्यांनी केला.

गुरुवारी हल्ल्यानंतर पंजाब विधानसभेत हल्ल्याचा निषेध करणारा ठराव देखील मंजूर करण्यात आला. एकीकडे शांततेसाठी चर्चा करायची आणि दुसरीकडे दहशतवादी संघटनांच्या मदतीने देशात कारवाया करायच्या, हा पाकिस्तानचा दुटप्पीपणा यातून उघड झाला आहे, असे त्यांनी सांगितले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button