breaking-newsआंतरराष्टीय

चंद्रामुळे झाले दिवसाचे २४ तास !

लंडन  : पृथ्वीवरील समुद्राच्या भरती-ओहोटीसह अनेक भौगोलिक घटनांमागे पृथ्वी-चंद्रामधील गुरुत्वीय बलाच्या समतोलाचा परिणाम आहे, हे स्पष्ट आहेच. त्याचबरोबर पृथ्वीच्या दिवसाच्या कालखंडही चंद्रामुळेच बदलल्याचे एका संशोधनामध्ये समोर आले आहे. सुमारे १.४ अब्ज वर्षांपूर्वी पृथ्वीवरील दिवस १८ तासांचा होता. त्यावेळी चंद्र पृथ्वीपासून जवळ होता आणि त्यामुळे पृथ्वीचा आसही आतापेक्षा वेगळा होता, असे या संशोधनामध्ये म्हटले आहे.

विस्कनसिन-मॅडिसन विद्यापीठातील भूविज्ञानाचे प्रा.स्टीफन मेयर्स  यांनी या संशोधनाचा अहवाल एका नियतकालिकामध्ये प्रसिद्ध केला आहे. चंद्राच्या पृथ्वीपासून दूर जाणे आणि त्यातून पृथ्वीचा स्वत:भोवती फिरण्याचा वेग बदलणे, यासाठी प्रा. मेयर्स यांनी स्वत:भोवती फिरणाऱ्या स्केटरचे उदाहरण दिले आहे. एखादा स्केटर फिरत असतो आणि तो त्याचे हात लांबवत फिरायला लागतो, तेव्हा त्याचा वेग मंदावतो. तीच गोष्ट चंद्र पृथ्वीपासून दूर गेल्यानंतर झाली आहे, असे त्यांनी या लेखामध्ये म्हटले आहे.

प्रा. मेयर्स यांनी पृथ्वीच्या भूगर्भाचा अभ्यास करतानाच, पृथ्वीवरील खडकांचे संशोधन करत सौरमाला आणि प्राचीन काळातील हवामानातील बदल यांच्याविषयीची वेगळी मांडणी केली आहे. या संशोधनामध्ये विविध कालखंडामध्ये तयार झालेल्या खडकांच्या स्तरांचा अभ्यास केल्यानंतर त्यातील बदलांच्या आधारे निष्कर्ष काढण्यात आला आहे. यात, उत्तर चीनमध्ये १.४ अब्ज वर्षांपूर्वीच्या झियामलिंग येथील खडकांचा स्तर आणि दक्षिण अटलांटिक महासागरातील ५.५ कोटी वर्षांपूर्वीच्या वॉल्विस पर्वतरांग या खडकांमधील बदल प्रामुख्याने तपासण्यात आले. यामध्ये त्या कालखंडातील पृथ्वीचा फिरण्याचा आस आणि सुर्याभोवतीच्या कक्षेची लांबी यांमुळे त्या खडकांच्या स्तरांवर भूर्गभीय परिणाम दिसून येतात. त्यावरून दिवसाचा कालखंड आणि पृथ्वी-चंद्र यांच्यातील अंतरही स्पष्ट होऊ शकते, असे या अहवालात म्हटले आहे.

पृथ्वीच्या स्वत:भोवती फिरण्याच्या प्रक्रियेमध्ये चंद्राबरोबरच अवकाशातील अन्य ग्रह व अन्य घटकांचाही परिणाम होत असतो. त्यामुळे पृथ्वीच्या आसही निश्चित होत असल्याचे यात म्हटले आहे. सध्याच्या आकडेमोडीनुसार, चंद्र पृथ्वीपासून दरवर्षी ३.८२ सेंटीमीटरने दूर जात आहे. यानुसार, १.५. अब्ज वर्षांपूर्वी पृथ्वी आणि चंद्रातील अंतर खूपच कमी होते आणि दोन्हींमधील गुरुत्वीय शक्तीचा परिणाम पृथ्वीवर स्पष्ट जाणवत होता, यावर शास्त्रज्ञांचे एकमत आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button