breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

“ग्रीन सिटी’ संकल्पना अंमलात आणा – वनमंत्री सुधीर मुनगंटीवार

मुंबई – “स्मार्ट सिटी-क्‍लीन सिटी’बरोबरच “ग्रीन सिटी’ संकल्पना अंमलात आणा, असे आवाहन वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले. राज्यात जुलै महिन्यात होणाऱ्या 13 कोटी वृक्ष लागवड कार्यक्रमात सहभागी होण्याचे आवाहन करण्यासाठी मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली बांधकाम व्यावसायिकांची बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते.

मुनगंटीवार म्हणाले, हरित शहरांच्या निर्मितीमध्ये बांधकाम व्यावसायिकांनी योगदान द्यावे, गृहनिर्माण सोसायट्यांची कामे करताना परिसरात मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करावी. वन हा विषय कुठल्याही कायद्याच्या चौकटीत न अडकवता अधिकाधिक लोकांना हे काम स्वत:च्या जीवनासाठी महत्त्वाचे वाटले पाहिजे. हा वन सत्याग्रह आपला आणि राज्याच्या अभिमानाचा विषय वाटला पाहिजे, अशी भावना आपण निर्माण करत आहोत. म्हणूनच राज्यात महावृक्ष लागवड हा केवळ शासनाचा उपक्रम राहिला नाही, ती आता लोकचळवळ झाली आहे.

पहिल्या वर्षी एकाच दिवशी 2 कोटी वृक्ष लागवडीचा संकल्प 2 कोटी 81 लाख रोपे लावून पूर्णत्वाला गेला, तर दुसऱ्या वर्षीच्या 4 कोटी वृक्षलागवडीच्या संकल्पाची 5 कोटी 43 लाख रोपे लावून पूर्तता झाली. लोकांनी वृक्ष लागवडीचा लोकोत्सव साजरा केला. या दोन्ही वर्षांच्या वृक्ष लागवडीची लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद झाली.

बांधकाम व्यावसायिकांनी वृक्ष लागवडीसाठी गावं दत्तक घ्यावीत आणि तेथील लोकसंख्येएवढी झाडे त्या गावात लावावीत, ती जगवावीत अशी अपेक्षा व्यक्त करून मुनगंटीवार म्हणाले, केंद्र शासनाने आता सीईआर अर्थात कॉर्पोरेट एन्व्हायरमेंट प्लान सादर करण्याच्या सूचना सर्व बांधकाम व्यावसायिकांना दिल्या आहेत. त्यादृष्टीनेही बिल्डर असोसिएशनने हा विचार पुढे न्यावा.

संस्थात्मक पातळीबरोबरच लोक मोठ्या प्रमाणात वैयक्तिक स्वरूपात वृक्ष लागवड करत आहेत. वैयक्तिक स्वरूपात होणारी ही वृक्ष लागवड “माय प्लांट’ या मोबाईलद्वारे वन विभागाच्या संकेतस्थळावर नोंदवा, असे आवाहन देखील मुनगंटीवार यांनी केले. शासनाने नुकताच एक नवीन निर्णय घेतला आहे. त्यानुसार महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत सामाजिक वनीकरण शाखेच्या सहाय्याने शेतात, शेताच्या बांधावर फळझाड लागवड करता येणार आहे. राज्यात ऍग्रो फॉरेस्ट संकल्पनेला गती देण्याचा प्रयत्न यातून होत आहे, असे त्यांनी सांगितले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button