breaking-newsताज्या घडामोडीपुणे

गणरायासाठी सजली बाजारपेठ, थर्माकोलबंदीमुळे पर्यावरणपूरकवर मंडळांचा भर

पिंपरी –  लाडक्या गणरायाचे अर्थात बाप्पाचे आगमन चार दिवसांवर येऊन ठेपल्याने पिंपरीतील बाजारपेठ सजली असून मखरे, विविध आकारांतील गणेशमूर्ती खरेदी, विद्युत सजावटीचे साहित्य खरेदी करण्यासाठी गर्दी होऊ लागली आहे. रविवार सुटीचा दिवस असल्याने आज मोठ्या प्रमाणावर गर्दी दिसून आली. प्लॅस्टिक आणि थर्मोकोल बंदीमुळे पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यावर गणेशभक्त भर देत आहेत.

गणेशोत्सवाची वाट वर्षभर पाहत असतात. बाप्पाचा उत्सव गुरूवारपासून सुरू होत आहे. लाडक्या गणरायाच्या स्वागतासाठी उद्योगनगरी सजली आहे. बाजारपेठही गणेशमय झाली आहे. विविध आकारांतील आणि विविध रूपांतील बाप्पांच्या मूर्ती लक्ष वेधून घेत आहेत. पिंपरी, चिंचवड, भोसरी, निगडी आणि दापोडी, आकुर्डी, तळवडे, थेरगाव, दिघी भागात मोठ्या प्रमाणावर गणेशमूर्ती विक्रीचे स्टॉल उभारण्यात आले आहेत. त्याठिकाणी मोठ्या प्रमाणावर गर्दी होत आहे.

मंडप टाकण्याची लगबग गणेशोत्सव जवळ आल्याने सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे कार्यकर्ते मंडप उभारणीच्या कामात मग्न आहेत. मंडप उभारणीचे काम जोरात सुरू आहे. तसेच सार्वजनिक वाहतुकीस अडथळा ठरू नये, अशी दक्षता घ्यावी, असे आवाहन पोलिसांनी केले होते. त्या आवाहनासही मंडळांनी प्रतिसाद दिला आहे. तसेच पुण्याप्रमाणेच पिंपरीचे हलते आणि जिवंत देखावे पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी होत असते. त्यामुळे देखावे काय करायचे याचे नियोजनही मंडळे करीत आहेत. तसेच देखांव्याच्या मूर्ती साकारण्यावर कलावंत अखेरचा हात देत आहेत. चौरंग, मूषकवाहक रथ, सिंहासन, कमळाच्या आकारातील मखरे, तसेच विविध झाडे, फुले, कागदी आणि कापडी हार, तोरणही दाखल झाले आहेत. पर्यावरणरक्षणासाठी मखर, सिंहासनांना मागणी वाढल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button