breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणे

खासदार बारणेंची लोकप्रियता असती, तर चार नगरसेवक निवडून आणता आले असते

– जनतेत नाराजी असलेल्या खासदार बारणेंचे आम्ही काम का करायचे ; भाजपचे एकनाथ पवार यांचा सवाल
पिंपरी, ( महा ई न्यूज ) –  मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांच्या बद्दल जनतेत प्रचंड नाराजीचा सुर आहे. पाच वर्षांत त्यांनी पाच ठोस अशी कोणतीच कामे केलेली नाहीत. मात्र, त्यांच्या काही बगलबच्च्यांना खासदार बारणे हे फार मोठे नेते असल्याचे आणि ते पुन्हा खासदार होणार, अशी स्वप्ने पडतात. त्याची एवढीच लोकप्रियता होती, आणि ते फार मोठे नेते होते, तर महापालिका निवडणुकीत त्यांना चार नगरसेवक तरी निवडून आणता आले का? असा पलटवार सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार यांनी केला आहे.
पवार यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे, मावळ मतदारसंघातील जनता जागृत आहे. खासदार बारणे हे नेहमी स्वतःच्या आत्मप्रौढी राजकीय विश्वात जगत असतात. त्यामुळे कार्यकर्त्यांचे नुकसान होत आहे. किंबहुना नुकसान झालेले आहे. खासदार म्हणून त्यांनी मावळ लोकसभा मतदारसंघात मिरवण्यापलीकडे काहीच काम केलेले नाही. केवळ पक्षांतर्गत भांडणे लावण्यातच त्यांनी आपल्या खासदारकीची टर्म वाया घालवली आहे. त्यांच्याविषयी मतदारांमध्ये मोठी नाराजी आहे.
अशा परिस्थितीत निवडणुकीत त्यांचा पराभव झाला तर भाजपचेही मोठे राजकीय नुकसान होणार आहे. बारणे हे काही निष्ठावान शिवसैनिक नाहीत. ते काँग्रेसमधूनच शिवसेनेत गेलेले आहेत. त्यांनी गजानन बाबर यांच्यासारख्या एका निष्ठावान शिवसैनिकाचा राजकीय बळी देऊन खासदारकी पटकावलेली आहे, हे सर्व जनतेला अजूनही ज्ञात आहे. आता पिंपरी-चिंचवड शहर शिवसेनेच्या संघटनेवर त्यांच्या बगलबच्च्यांनी ताबा मिळवला आहे. शिवसेना म्हणजे आमचाच सात-बारा असल्यासारखे वागणाऱ्या बारणे यांच्या बगलबच्च्यांनी आपल्या नेत्याने अख्ख्या राजकीय जीवनात एका तरी कार्यकर्त्याला ताकद देऊन मोठे केले आहे का? हे आधी दुर्बिण लावून तपासून पाहावे. त्यात त्यांना सत्य काय ते दिसेल. आमचे नेते केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना आम्ही भाजपच्या निष्ठावान पदाधिकारी व नगरसेवकांनी बारणे यांचे काम करण्यास लावू नका म्हणून निवेदन दिले. परंतु, त्याला प्रत्युत्तर देणाऱ्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांपैकी एक तरी निष्ठावान शिवसैनिक आहे का?, असा सवालही त्यांनी केला आहे. बारणे यांचे काम करणार नाही, असे सांगणारे भाजपचे 400 निष्ठावान कार्यकर्ते आम्ही उभे करून दाखवतो. बारणे यांनी त्यांच्या मागे किमान 100 निष्ठावान शिवसैनिक आहेत हे दाखवून द्यावे, असे आव्हानही पवार यांनी दिले आहे.
2014 च्या लोकसभा निवडणुकीत मोदी लाट होती. भाजपच्या कार्यकर्त्यांनी दिवस रात्र एक करून श्रीरंग बारणे यांचा प्रचार केला. निवडणुकीत बारणे यांना 5 लाख 12 हजार 30 मते पडली. त्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार लक्ष्मण जगताप यांना 3 लाख 54 हजार 730 मते, तर राष्ट्रवादीचे उमेदवार राहुल नार्वेकर यांना 1 लाख 82 हजार 237 मते मिळाली. जगताप आणि नार्वेकर यांच्या मतांची बेरीज केल्यास बारणे यांच्या विरोधात 5 लाख 36 हजार 967 मते पडल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होते. विरोधी मतांची आकडेवारी आगामी लोकसभा निवडणुकीचे राजकीय चित्र सांगणारी आहे. त्यातच बारणे यांनी आपल्या खासदारकीच्या टर्ममध्ये स्वपक्षाच्या कार्यकर्त्यांना कोणतीही ताकद दिली नाही. त्यामुळे शिवसैनिकांमध्येही त्यांच्याविषयी मोठी नाराजी आहे. त्याचे परिणाम महापालिका निवडणुकीत शिवसेनेला भोगावे लागले हे वास्तव आहे. केवळ बारणे यांच्या आत्मप्रौढी राजकारण आणि ताठर भूमिकेमुळे महापालिका निवडणुकीत शिवसेनेला दारूण पराभव पाहावा लागला. त्यातून बारणे यांनी कोणताही धडा न घेता आपला एककल्ली कारभार कायम ठेवला आहे.
तरीही त्यांचे बगलबच्चे बारणे हे सर्व सामान्यांशी समरस होणारा खासदार असल्याचे सांगत स्वतःच्या अकलेचे तारे तोडत आहेत. बारणे यांच्या कुचकामी प्रवृत्तीमुळे शिवसेनेचा घात होईल आणि भाजपचेही नुकसान होईल. त्याची भिती वाटल्यानेच आमच्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी आमच्या नेत्यांना स्पष्टपणे सांगण्याचे धाडस केले. ही बाब खासदार बारणे आणि त्यांच्या बगलबच्च्यांना खटकल्याचे दिसत आहे. शिवसेनेने कोणाला उमेदवारी द्यावी, हा त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे. परंतु, युती झाली आणि मावळ मतदारसंघ शिवसेनेच्या वाट्याला गेला, तर शिवसेनेने जिंकून येणाऱ्यालाच उमेदवारी द्यावी, या भूमिकेवर भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते ठाम असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button