breaking-newsमहाराष्ट्रमुंबई

खासगी बँक व्यवस्थापकाला दहा लाखांना गंडा

मुंबई : खासगी बँकेच्या बोरिवली शाखेत व्यवस्थापक असलेल्या तरुणाला ऑनलाइन भामटय़ांनी दहा लाख रुपयांचा गंडा घातल्याचे प्रकरण बोरिवली पोलीस ठाण्यात तपासासाठी आले आहे.

तक्रारदार व्यवस्थापक कुटुंबासह चेंबूरला वास्तव्यास आहे. गेल्या चार वर्षांपासून बोरिवली शाखेत व्यवस्थापकपदाची जबाबदारी सांभाळल्यानंतर तक्रारदार तरुणाने जास्त पगाराच्या नोकरीचा शोध सुरू केला. त्यासाठी त्याने नोकरी गल्फ नावाच्या संकेतस्थळावर स्वत:ची माहिती दिली होती. गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात त्याला रोनीत मेहरा या नावे एक फोन आला. संयुक्त अरब अमिराती (यूएई), आखाती देशात चांगल्या पगाराची नोकरी मिळवून देण्याचे काम करतो, असे मेहराने तक्रारदाराला सांगितले. यूएईतील फर्स्ट गल्फ बँकेत ऑपरेशन मॅनेजर यापदी वर्णी लावू शकतो, ही नोकरी मिळाल्यास वार्षिक ४८ लाख रुपये पगार हाती पडू शकेल, असे आमिष रोनीतने तक्रारदाराला दाखवले. तक्रारदाराने होकार देताच प्रोसेसिंग फी, व्हिजा आणि अन्य निमित्त काढून तीन महिन्यांत रोनीत व त्याच्या साथीदारांनी तक्रारदाराला विविध खात्यांमध्ये पैसे भरण्यास सांगितले. कोणतीही शहानिशा न करता तक्रारदार तरुण ही रक्कम भरत गेला. १२ नोव्हेंबरला तक्रारदाराने अखेरचे ८९ हजार ७०० रुपये रोनीतने सांगितलेल्या खात्यावर जमा केले. या तीन महिन्यांमध्ये १० लाख रुपये भरल्यानंतरही रोनीतकडून नोकरीबाबत सातत्याने टाळाटाळ होत होती. तेव्हा तक्रारदार तरुणाने चौकशी केली. त्यानंतर त्याला फसवणूक झाल्याचे लक्षात आले. या प्रकरणी बोरिवली पोलिसांनी माहिती तंत्रज्ञान कायद्यातील विविध कलमांनुसार फसवणुकीचा गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button