breaking-newsपुणेमहाराष्ट्र

खाऊ खुशाल : नवलाखा लाडूवाले

हल्ली अनेक हॉटेलमध्ये शेंगदाणा लाडूंची बरणी दर्शनी भागात दिसते. या लाडूंना मागणीही चांगली आहे. शेंगदाण्याचे लाडू म्हटलं की नवलाखा लाडूवाले हे नाव हमखास निघतंच.

पुण्यातील अनेक हॉटेलमध्ये, मिठाईच्या दुकानांमध्ये, चहा-कॉफीच्या छोटय़ा हॉटेलमध्ये, अगदी छोटय़ा-छोटय़ा स्नॅक्स सेंटरमध्ये शेंगदाण्याचे लाडू हा पदार्थ हल्ली अविभाज्य झाला आहे. या बहुतेक हॉटेलच्या काउंटरवर हमखास दिसते ती दाण्याच्या लाडूंची बरणी. एकाच आकाराच्या या लाडूंची छान मांडणी केलेली असते. भरपूर खप असलेले हे लाडू जसे हॉटेलमध्ये ठेवले जातात, तसेच ते अनेक किराणामालाच्या दुकानांमध्येही ठिकाणी दिसतात. शेंगदाणा लाडू म्हटलं की नवलाखा लाडूवाले हे नाव लगेच आठवतं. मुकुंदनगरमध्ये राहणाऱ्या नवलाखा यांचा हा घरगुती व्यवसाय असला, तरी उत्तम प्रतीचे लाडू तयार करून ते पुरवण्यात त्यांनी अनेक र्वष सातत्य ठेवल्यामुळे बाला आणि त्यांचे पती भरत नवलाखा यांच्या या व्यवसायाची ओळख खवय्यांमध्ये नवलाखा लाडूवाले अशी आहे.

नवलाखा यांचा मूळचा व्यवसाय तसा चटण्यांचा. चांगली, घरगुती चवीची, ताजी चटणी घरगुती पद्धतीनं तयार करून दिली तर तिला ग्राहक मिळेल, या विचारातून नवलाखा यांनी शेंगदाणा चटणी, खोबरा चटणी अशा चटण्यांची उत्पादनं साधारण वीस वर्षांपूर्वी सुरू केली. पुढे त्यांना अनेकविध चटण्यांची जोड मिळाली. चटण्यांसाठी लागणारे सर्व घटक पदार्थ अतिशय दर्जेदार वापरायचे आणि उत्पादन मोठय़ा प्रमाणात करायचं असलं, तरी चवीची परंपरा जपायची, अशा पद्धतीनं नवलाखा यांनी चटण्या पुरवल्यामुळे या चटण्या लोकांच्या पसंतीला उतरल्या. नवलाखा गृह उद्योगाच्या या चटण्या अन्नपूर्णा या नावानं उपलब्ध असतात.

चटण्यांचा हा व्यवसाय सुरू असतानाच दहा वर्षांपूर्वी बाला नवलाखा यांनी शेंगदाणा लाडूंच्या व्यवसायाला अगदी छोटय़ा स्वरूपात सुरुवात केली. त्यांनी घरी थोडे लाडू तयार करून बघितले पण ते कोणाला द्यायचे हा प्रश्न होता. मग ते लाडू घेऊन त्यांनी अनेक प्रसिद्ध दुकानांमध्ये जाऊन लाडू घेण्याची विनंती करायला सुरुवात केली. सुरुवातीच्या या काळात खूप परिश्रम घ्यावे लागल्याचं त्या सांगतात. अर्थात हा व्यवसाय सुरू केल्यापासून ते अगदी सद्य:स्थितीपर्यंत त्यांनी परिश्रमांमध्ये कुठेही तडजोड केलेली नाही. त्यामुळेच व्यवसाला उत्तम स्वरूप लाभलं आहे.

व्यवसायाला प्रारंभ केल्यानंतर लाडूंची चव आणि दर्जा उत्तम असल्यामुळे हळूहळू दाण्याच्या लाडूंची मागणी वाढत गेली. हे लाडू करण्याचंही तंत्र आहे. ते त्या कसोशीनं अनेक वर्ष सांभाळत आहेत. मुख्य म्हणजे दाणे आणि गूळ हे जे दोन महत्त्वाचे घटक पदार्थ आहेत त्याचा दर्जा कसा हवा हे पक्कं ठरलेलं आहे. गूळ कराड, कोल्हापूर या भागातलाच घेतला जातो. दाणे देखील चांगल्या प्रतीचेच घेतले जातात. दाणे आणून ते स्वच्छ करून ते विशिष्ट पद्धतीनं भट्टीमधून भाजून घेतले जातात. हे दाणे भाजून घेण्याचंही तंत्र आहे. ते किती वेळ आणि कसे भाजायचे हे अनुभवातून लक्षात आलेलं असल्यामुळे त्या पद्धतीनं ते भाजून घेऊन नंतर त्यांचं यंत्रात कूट केलं जातं. ते देखील किती बारीक वा किती जाड करायचं हेही ठरलेलं आहे. लाडूंसाठी गुळाच्या ढेपा आणल्या की तो फोडून घेण्याचंही काम करावं लागतं. त्यानंतर फोडलेला गूळ आणि दाण्याचं कूट छोटय़ा यंत्रात एकत्र केलं जातं आणि नंतर दाण्याचे लाडू हाताने तयार केले जातात.

उत्तम चवीमुळे बाला नवलाखा यांचे लाडू खवय्यांच्या पसंतीला उतरले. त्यामुळे लाडूंची मागणीही वाढत गेली. मुख्य म्हणजे कितीही मोठी ऑर्डर असली, तरी लाडूंसाठी मशिनचा वापर केला जात नाही. हे लाडू त्या हाताने तयार करतात. त्यातही त्यांनी मोठं कौशल्य मिळवलं आहे. शिवाय उद्योगाच्या माध्यमातून त्यांनी आतापर्यंत कित्येक महिला आणि युवतींना रोजगारही दिला आहे. नवलाखा यांचे हे लाडू अनेक हॉटेलमध्ये आणि दुकानांमध्ये असतातच शिवाय त्यांच्या घरी देखील (संपर्क- १८ मुकुंदनगर, सनफ्लॉवर अपार्टमेंट, ९६६५०३९२४०) त्यांची विक्री सुरू असते. त्यामुळे उत्तम घरगुती चवीच्या वेगवेगळ्या चटण्या आणि लाडूंसाठी हे नाव अवश्य लक्षात ठेवायला हवं.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button