breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणे

खंडाळा घाटातली दरड हटवली, पुणे-मुंबई रेल्वे सेवा पूर्ववत

पुणे  –  पुणे-मुंबई लोहमार्गावर शनिवारी (25 ऑगस्ट) रात्री 10.50 वाजण्याच्या सुमारास मंक्की हिलजवळ अप व मिडल या दोन्ही मार्गावर दरड कोसळल्याने रेल्वे सेवा ठप्प झाली होती. मध्यरात्री खंडाळा घाटातली दरड हटवण्यात आल्यानं पुणे-मुंबई रेल्वे सेवा पूर्ववत झाली आहे. यामुळे प्रवाशांना दिलासा मिळाला आहे. दरम्यान, दरड कोसळल्यानं  शनिवारी अनेक लांब पल्ल्याच्या गाड्या विविध स्थानकांवर थांबवण्यात आल्या होत्या. रात्री 12.30 वाजण्याच्या सुमारास रेल्वेच्या अप लाईनवरील दरड हटवून हा मार्ग सुरु करण्यात आला असला तरीही मिडल लाईन ही बंदच होती.

मंक्की हिलजवळ दरड कोसळल्याने कोल्हापूर-अहमदाबाद ही गाडी खंडाळा रेल्वे स्थानकावर थांबविण्यात आली तर सोलापूरला जाणारी सिद्धेश्वर एक्स्प्रेस सीएसटीलाच थांबविण्यात आली होती. यासह रात्रीच्या वेळेला धावणार्‍या अनेक लांब पल्ल्याच्या गाड्या उशिराने धावल्या. लोणावळा व खंडाळा परिसरात मागील काही दिवसांपासून पावसाचा जोर असल्याने डोंगरभागातील दगड मार्गावर येऊ लागले आहे. शुक्रवारी (24 ऑगस्ट) दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास देखील याच ठिकाणी रेल्वे इंजिनच्या समोर दरड कोसळली होती. सुदैवाने त्यावेळी वाहतुकीवर परिणाम झाला नव्हता.

याठिकाणी सुरक्षेचा उपाय म्हणून रेल्वे प्रशासनाने शुक्रवारी दिवसभर विद्युत पुरवठा बंद ठेवत डोंगरातील धोकादायक दगड काढले होते. यानंतरही शनिवारी पुन्हा त्याच ठिकाणी दरड पडल्याची घटना घडल्याने प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सुदैवाने दोन्ही घटन‍ांमध्ये कोणतीही जीवितहानी वा वित्तहानी झालेली नाही.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button