breaking-newsपुणेमहाराष्ट्र

केईएममधील बालिका मृत्यु प्रकरणाची चौकशी होणार

मुलीच्या वडिलांची पोलिसांत तक्रार: ससूनची समितीकडून होणार चौकशी?
पुणे- चार महिन्याच्या बालिकेचा केईएम हॉस्पिटलमधील डॉक्‍टरांच्या हलगर्जीपणामुळेच मृत्यू झाला असल्याची तक्रार पालकांनी पोलिसांकडे केल्यानंतर आता या एकूणच प्रकरणाची चौकशी केली जाणार आहे. त्याबाबत कागदपत्रे गोळा करुन ससूनमधील डॉक्‍टरांच्या समितीकडे सादर केली जातील. या समितीकडून चौकशी झाल्यानंतर दोषी आढळणाऱ्यांवर गुन्हा दाखल केला जाईल अशी माहिती समर्थ पोलिस स्टेशनचे सहायक पोलिस निरीक्षक डॉ.संजय चव्हाण यांनी दिली.

केईएम प्रकरणी विनायक चौधरी यांचा तक्रार अर्ज आमच्याकडे प्राप्त झाला आहे. त्यानुसार सर्व कागदपत्रे गोळा करत, स्टेटमेंट घेऊन हे सर्व ससूनमधील समितीला देण्यात येणार. ही समिती स्थापन केलेलीच असते. त्या समितीच्या चौकशीत हॉस्पिटलचे कर्मचारी दोषी आढळले तर गुन्हा दाखल केला जाईल.
-डॉ. संजय चव्हाण, सहायक पोलीस निरीक्षक, समर्थ पोलीस स्टेशन

चार महिन्याच्या गौतमी विनायक चौधरी या चिमुरडीचा केईएमच्या पहिल्या मजल्यावरील आयसीयुमधून चौथ्या मजल्यावरील शस्त्रक्रिया गृहात नेत असताना मृत्यू झाला. गुरुवारी सकाळी साडेसातच्या सुमारास ही घटना घडली. तिला हलवतानाच डॉक्‍टर आणि स्टाफकडून हलगर्जीपणा झाल्याने गौतमीचा मृत्यू झाला असल्याचा आरोप तिच्या पालकांकडून करण्यात आला आहे. तसेच पिवळे रेशनकार्डधारक असुनही मोफत उपचार करण्याऐवजी पैसे जमा करण्याची मागणी केली असल्याचेही पालकांनी पोलिसांना केलेल्या तक्रारीत म्हटले आहे. या पैशासाठीच डॉक्‍टरांनी ऑपरेशनही आठवडाभर पुढे ढकलले. दोन लाख रुपये भरत नाही तोपर्यंत ऑपरेशन होणार नाही असे येथील डॉक्‍टर तेहनाज चोटीवाला यांनी सांगितले असे या तक्रारीत म्हटले आहे. तसेच सहा दिवसांपूर्वी सर्व पैसे भरले असतानादेखील आठ दिवस ऑपरेशन लांबवले असल्याचा आरोपही चौधरी यांनी केला आहे.
याप्रकरणी गौतमीचे वडील विनायक चौधरी यांनी समर्थ पोलीस ठाण्यात गुरुवारी उशिरा लेखी तक्रार दिली आहे. तक्रारीनुसार केईएमचे प्रशासकीय प्रमुख डॉ. विश्‍वनाथ येमुल, डॉ. तेहनाज चोटीवाला या डॉक्‍टरांसह स्टाफ, कर्मचारी यांच्यावर गुन्हा दाखल करावा असे म्हटले आहे. समर्थ पोलिसांनी हा तक्रार अर्ज दाखल करून घेतला आहे. दरम्यान बालिकेच्या मृतदेहाचे पोस्टमार्टम करणार नसल्याने गुरूवारी उशिरा नातेवाईकांनी बालिकेचा मृतदेह ताब्यात घेत तिच्यावर अंत्यसंस्कार केले.

याबाबत डॉक्‍टरांच्या हलगर्जीपणामुळे या बालिकेचा मृत्यू झाला अशा प्रकारची तक्रार अद्याप आमच्याकडे प्राप्त झालेली नाही. या बालिकेचा शवविच्छेदन अहवाल नसला तरीही त्याची तक्रार मेडिकल बोर्डकडे दाखल करता येऊ शकते.
– डॉ. अजय तावरे, वैद्यकिय अधीक्षक, ससून रुग्णालय

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button