breaking-newsराष्ट्रिय

‘केंद्र सरकारच्या मनमानीविरोधात देशात पुन्हा एकदा पुरस्कारवापसी’

लोकपाल आणि लोकायुक्त नियुक्त्यांबाबत दोन दिवसांत निर्णय न झाल्यास पद्मभूषण पुरस्कार राष्ट्रपतींना परत करणार, असा इशारा ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी केंद्र आणि राज्य सरकारला दिला आहे. तर दुसरीकडे नागरिकता दुरुस्ती विधेयकाच्या विरोधात मणिपुरचे प्रसिद्ध चित्रपट निर्माते अरिबाम श्याम शर्मा यांनी आपला पद्मश्री पुरस्कार सरकारला परत केला आहे. यावरून राष्ट्रवादी काँग्रेसने केंद्र तसेच राज्य सरकारवर टिका केली आहे. सत्ता मिळाल्यानंतर भाजपाला लोकपालाचा विसर पडल्याची टिका राष्ट्रवादीने केली आहे.

फेसबुक तसेच ट्विटवर केलेल्या पोस्टमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने अण्णा हजारे आणि अरिबाम श्याम शर्मा यांचे फोटो पोस्ट करुन त्यावर ‘केंद्र सरकारच्या मनमानीविरोधात देशात पुन्हा एकदा पुरस्कारवापसी’ असं म्हटलं आहे. या फोटोबरोबर लिहिलेल्या पोस्टमध्ये, ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे देशातील केंद्र सरकार आणि राज्यातील देवेंद्र फडणवीस यांचे राज्य सरकार यांच्या कारभाराबाबत जनतेत असंतोष पसरला आहे.’ असं राष्ट्रवादी काँग्रेसने म्हटले आहे. ‘महाराष्ट्रात जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे लोकपाल नियुक्तीसाठी उपोषणाला बसले आहेत. भारतीय जनता पार्टीनेही सत्तेत येण्यापूर्वी लोकपालाची मागणी केली होती. पण सत्ता मिळाल्यानंतर त्यांना या मागणीचा सोयीस्कर विसर पडला. अण्णांच्या उपोषणाचा हा सहावा दिवस आहे. लोकपाल नियुक्ती झाली नाही, तर पद्मभूषण पुरस्कार परत देण्याचा इशारा त्यांनी दिला असल्याचेही या पोस्टमध्ये नमूद करण्यात आले आहे.

याच पोस्टमध्ये केंद्र सरकारचा निषेध करण्यासाठी पद्मश्री पुरस्कार परत करणाऱ्या अरिबाम श्याम शर्मा यांच्या संघर्षाची दखलही राष्ट्रवादीने घेतली आहे. ‘नरेंद्र मोदी यांच्या केंद्र सरकारचा निषेध करण्यासाठी नागरिकता दुरुस्ती विधेयकाच्या विरोधात मणिपुरचे प्रसिद्ध चित्रपट निर्माते अरिबाम श्याम शर्मा यांनी पद्मश्री पुरस्कार परत केला आहे. नागरिकता विधेयकाला त्यांनी कडाडून विरोधही केला आहे. मणिपुरमधील काही सामाजिक संघटनांनीही या वादग्रस्त विधेयकाचा निषेध नोंदवला आहे. या विधेयकाने बांगलादेश, पाकिस्तान आणि अफगाणिस्तानातून स्थलांतरित झालेल्या अल्पसंख्यांकांना भारतीय नागरिकत्व देण्यास मंजुरी दिली आहे. याविरोधात मणिपूरमध्ये स्थानिकांनी आंदोलनेही सुरू केली आहेत.’ असं या पोस्टमध्ये राष्ट्रवादीने म्हटले आहे.

दरम्यान महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सोमवारी सकाळी राळेगणसिद्धी येथे जाऊन ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची भेट घेतली. अण्णांच्या उपोषणाला मनसेचा पूर्ण पाठिंबा असल्याचे त्यांनी सांगितले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button