breaking-newsपुणे

कालवा फुटीनंतर नीलम गायकवाड सोशल मीडियावर हिट

  • महिला पोलीस कर्मचाऱ्याचे सर्वस्तरातून कौतूक : पोलीस आयुक्तांनीही घेतली दखल

पुणे – पाण्याचा प्रचंड प्रवाह आणि मदतीसाठी दोरी पकडून उभे असलेले नागरिक अशा स्थितीत पाठीवर एका लहान मुलाला घेऊन दुर्घटनाग्रस्तांची मदत करणाऱ्या महिला पोलीस कर्मचारी नीलम गायकवाड या सोशल मीडियावर हिट झाल्या आहेत. आपत्कालीन परिस्थितीत त्यांनी दाखविलेल्या धैर्याबद्दल त्यांचे सर्वच स्तरातून कौतूक होत आहे. खुद्द पोलीस आयुक्तांनीही याची दखल घेतली असून त्यांचे छायाचित्र तातडीने फ्रेम करून पोलीस आयुक्‍त कार्यालयात लावण्यात आले आहे.

पोलीस आयुक्त स्वत: लवकरच नीलम गायकवाड यांची भेट घेणार आहेत. गायकवाड यांनी दाखवलेल्या धाडसाची पोलीस दलात सर्वत्र चर्चा आहे. पोलीस आयुक्‍तांनी त्यांचे छायाचित्र ट्विट केल्यावर त्या प्रसिध्दीच्या झोतात आल्या. दुसऱ्यादिवशी सर्वच माध्यमांनी त्यांची छायाचित्रे प्रसिद्ध करून त्यांच्या धाडसाचे कौतुक केले. त्यांचे सहकारी दत्तवाडी पोलीस स्टेशनचे पोलीस शिपाई संतोष सूर्यवंशी यांनी देखील प्रसंगावधान दाखवत लहान मुलाचे प्राण वाचवले.

पोलीस दलात चांगले काम करण्याची इच्छा

नीलम गायकवाड या वडगावशेरी येथील रहिवाशी आहेत. त्यांचे प्राथमिक शिक्षण पुण्यातच झाले, तर महाविद्यालयीन शिक्षण फर्ग्युसन महाविद्यालयात झाले. मैत्रींणींसोबत त्याही एमपीएससीची तयारी करीत होत्या. दरम्यान, त्यांना पोलीस दलात पोलीस शिपाई म्हणून संधी मिळाली. पोलीस दलात ठरवून आले नसले तरी इतरांपेक्षा काहीतरी वेगळे करण्याची पहिल्यापासूनच इच्छा असल्याचे त्यांनी सांगितले.

दत्तवाडी येथील घटना कळताच सहकाऱ्यांसह तेथे धाव घेतली. सुरवातीला परिस्थिती इतकी गंभीर असेल याची कल्पना नव्हती. मी थोड्याच वेळात पाण्याचा मोठा प्रवाह वाहत असल्याचे दिसल्यावर गांभीर्य कळाले. नागरिक पाण्यात अडकले असल्याचे कळताच क्षणाचाही विलंब न लावता मदतकार्यात धाव घेतली. एका टेम्पोतील दोरी आणि एका पंक्‍चरच्या दुकानातील ट्यूब रस्ता दुभाजकाला बांधून घराबाहेर अडकलेल्या एकाला नागरिकाच्या मदतीने बाहेर काढले. यानंतर लहान मुले व महिलाही अडकल्याचे समजतात. स्वत: दोरीचा आधार घेउन सात ते आठ जणांची सुटका केली. तोवर मोठी गर्दी जमा झाली होती.

मात्र, गर्दीतील नागरिक मदत करण्याऐवजी मोबाइलवर सेल्फी किंवा व्हिडीओ काढण्यात दंग होते. अग्निशमन दलाचे जवान आल्यावर खऱ्या अर्थाने मदतकार्य सुरू झाले. मदतकार्य करतानाचे छायाचित्र व्हायरल झाल्यावर घरच्यांनी व मैत्रिणींनी खूप कौतूक केले. वरिष्ठ अधिकाऱ्यांनीही शाबासकीची थाप दिली. यापुढेही असेच चांगले काम करण्याचा मानस आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button