breaking-newsमुंबई

कामावर या, नाहीतर घरे सोडा..

  • बेस्ट कर्मचाऱ्यांवर प्रशासनाचे ‘नोटिसास्त्र’; आज कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांचा मोर्चा

मुंबई – बेस्ट कर्मचाऱ्यांचा संप मोडून काढण्यासाठी बेस्ट उपक्रमाने बुधवारी मेस्मांतर्गत (अत्यावश्यक सेवा कायद्यांतर्गत)कारवाईला सुरुवात केली. कामावर हजर व्हा, अन्यथा घरे रिकामी करा, अशा नोटिसाच भोईवाडा व परळ येथील बेस्ट वसाहतीतील कर्मचाऱ्यांना बजावण्यात आल्या. त्यामुळे बेस्ट संघटना व प्रशासनातील संघर्ष आणखी चिघळला.

जवळपास दोन हजार कर्मचाऱ्यांना अशआ नोटिसा बजावण्यात आल्याचे सांगण्यात येते. उपक्रमाच्या या भूमिकेविरोधात गुरुवारी वडाळा आगारात कर्मचारी वसाहतीतील महिला  ‘कुटूंब मोर्चा’ही  काढणार आहेत. संपातून शिवसेनेने माघार घेतल्याने संपाची धार कमी होईल अशी शक्यता होती. परंतु कर्मचाऱ्यांनी ऐक्य दाखवून संपात उत्स्फुर्तपणे सहभाग कायम ठेवला. दिवसभरात बेस्टने अकरा बस गाडय़ा चालवण्याचा प्रयत्न केला. संपावर तोडगा निघाला नसल्याने गुरुवारीही संप सुरूच राहण्याची शक्यता आहे.

विविध मागण्यासंदर्भात बेस्ट कामगार संयुक्त कृती समितीने बेमुदत संप पुकारला आहे. या संपाला सोमवारी मध्यरात्रीपासूनच चांगला प्रतिसाद मिळू लागला. बुधवारीही संपावर तोडगा निघाला नाही. त्यामुळे बेस्टच्या आगारात बस गाडय़ा उभ्याच होत्या. संप मिटवण्यासाठी मुंबई पालिकेप्रमाणे बेस्ट उपक्रमाकडून सुरू असलेले प्रयत्न फोल ठरले. मागण्यांसदर्भात दिवसभरात बेस्ट उपक्रम व बेस्ट संघटनांत सुरू असलेल्या बैठकातून तोडगा निघाला नव्हता.

संप मोडून काढण्यासाठी बेस्ट उपक्रमाने मेस्माअंतर्गत मुंबईतील बेस्ट वसाहतीतील राहती घरे रिकामी करण्याची नोटीस बजावली. बेस्ट कर्मचारी राहात असलेल्या भोईवाडा वसाहतीत बेस्टच्या समाजकल्याण विभागाच्या कर्मचाऱ्यांमार्फत ही नोटीस बजावण्यात आली. त्याला रहिवाशांनी विरोध केला. नोटीस बजावल्याचे समजताच मोठय़ा संख्येने कर्मचारी हजर झाले. या वसाहतीत १,२०० रहिवासी राहतात.

परळ, कुर्ला येथील वसाहतीतील कर्मचाऱ्यांनाही नोटीस बजावण्यात आली होती. परंतु कर्मचारी व कुटूंबियांनी विरोध केल्याने मुंबईतील अन्य वसाहतीत राहणाऱ्या कर्मचाऱ्यांना नोिटसा बजावल्या नाहीत. जवळपास दोन हजार कर्मचाऱ्यांना नोटीस धाडण्यात आली आहे.

उपक्रमाच्या या भूमिकेविरोधात वडाळा आगारात बेस्ट कर्मचारी वसाहतीतील महिलांचा कुटूंब मोर्चा सकाळी ११ वाजता काढला जाणार आहे. मुंबईत भोईवाडा, परळ याबरोबरच वडाळा, घाटकोपर, विक्रोळी, मालवणी, मुलुंड, सांताक्रुझ यासह अन्य काही ठिकाणीही बेस्ट कर्मचारी वसाहती आहेत. जवळपास चार हजारपेक्षा जास्त कर्मचारी या वसाहतीत राहतात, असे सांगण्यात आले.

३०० कर्मचाऱ्यांना मेस्मांतर्गत नोटिसा

घरे रिकामी करण्याची नोटीस बजावतानाच संपात सामिल झालेल्या ३०० कर्मचाऱ्यांनाही मेस्माअंतर्गत नोटिसा देण्यात आल्या आहेत. यानंतर कारवाई होणार असल्याचे सांगितले जाते.

कामगार सेनेला सोडचिठ्ठी

संपातून शिवसेनेने मंगळवारी रात्री माघार घेतल्यानंतर बुधवारी ५०० ते ६०० बस गाडय़ा धावतील,असा दावा केला जात होता. परंतु हा दावा फोल ठरला. बेस्ट कामगार सेनेतील कार्यकर्ते संपाच्या भूमिकेवर ठाम राहिले. वांद्रे, आणिकनगर, शिवाजी नगर, विक्रोळी, मुलुंड आगारातील कर्मचाऱ्यांनी संघटनेचे राजीनामे दिले व संपाला पाठिंबा जाहीर केला. यामुळे ५०० पेक्षा जास्त गाडय़ा धावतील असा दावा केला जात असतानाच अवघ्या अकराच बस गाडय़ाच धावल्या. तर ६,६४४ चालकांपैकी १९ आणि ७,०२१ वाहकांपैकी १४ जणांनीच हजेरी लावली.

उद्धव ठाकरे यांची मध्यस्थी

बेस्टचा संप चिघळत असल्याने यातून तोडगा काढण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मध्यस्थी करणार आहेत. बीडचा दौरा संपवून ते गुरुवारी मुंबईत परतणार आहेत. त्यानंतर  उद्धव ठाकरे हे मुंबई पालिका आयुक्त, बेस्ट महाव्यवस्थापक व संघटनांसोबत बैठक घेतील. यात नक्की तोडगा निघेल, असे बेस्ट कामगार सेना अध्यक्ष सुहास सामंत यांनी सांगितले. ही बैठक मातोश्रीवर होईल कि महापौर निवास्थानी हे अद्याप निश्चित नाही.

बैठकीला जाणार नाही : राव

बेस्ट कामगार संयुक्त कृती समितीचे नेते शशांक राव यांनी सांगितले की,  बेस्ट उपक्रमासोबत बुधवारीही झालेल्या बैठकीतून तोडगा निघाला नाही. त्यामुळे संपावर ठाम आहोत. शिवसेनेने संपातून माघार घेतली. कर्मचारी विरोधी घेतलेली भूमिका योग्य नाही. उद्धव ठाकरे यांनी बैठकीला जरी बोलावले तरी आम्ही जाणार नाही.

सत्ताधाऱ्यांनी लक्ष न दिल्याने संप चिघळला -भाजप

मुंबई – सत्ताधाऱ्यांनी वेळीच लक्ष न दिल्याने बेस्ट कर्मचाऱ्यांचा संप चिघळला, असा आरोप करीत पालिकेतील पारदर्शकतेच्या पहारेकऱ्यांनी बुधवारी बेस्ट प्रश्न मौन सोडले आणि शिवसेनेला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले. संप करुन मुंबईकरांना वेठीस धरणे योग्य नाही, असा टोलाही भाजपने बेस्टमधील कामगार संघटनांना लगावला आहे. दुसऱ्या दिवशीही तोडगा निघू न शकल्यामुळे बेस्ट कामगारांचा संप सुरूच आहे. पालिकेतील सत्ताधाऱ्यांनी बेस्ट कामगारांच्या संपाकडे गांभीर्याने लक्ष द्यायला हवे होते. मात्र तसे न झाल्याने संप चिघळला आहे, असा आरोप पालिकेतील भाजपचे गटनेते मनोज कोटक यांनी केला. गेले वर्षभर बेस्ट उपक्रमाच्या आर्थिक स्थितीवर चर्चा सुरू आहे. मात्र त्यावर ठोस तोडगा काढण्यात आला नाही. मात्र आता निर्णय घेण्याची वेळ आली आहे, असेही कोटक म्हणाले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button