कागदी पिशव्यांचा भाव वधारला
प्लास्टिक पिशव्यांना पर्याय म्हणून बाजारात खाकी कागदाच्या पिशव्या
प्लास्टिक बंदीचा निर्णय घेण्यात आल्यानंतर दैनंदिन वापरातील प्लास्टिकच्या वस्तूंना पर्याय शोधण्याला वेग आला आहे. प्लास्टिक पिशव्यांना पर्याय म्हणून कागदी तसेच खाकी कागदाच्या पिशव्यांची मागणी वाढत आहे. वाढत्या मागणीबरोबरच नेहमी परवडणाऱ्या कि मतीत उपलब्ध असलेल्या कागदी पिशव्या आणि कागद यांचा भाव वधारला आहे.
प्लास्टिक पिशव्यांवरील बंदी लागू झाल्यानंतर प्लास्टिकला पर्याय म्हणून पर्यावरण पूरक गोष्टींचा वापर करण्यास सुरुवात झाली आहे. दैनंदिन वापरासाठी नागरिकांकडून किंवा उद्योजकांकडून ग्राहकांना देण्यासाठी कागदी पिशव्यांची खरेदी मोठय़ा प्रमाणावर करण्यात येत आहे. त्यामुळे प्लास्टिक बंदीपूर्वी ३० ते ३५ रुपये किलो या दराने मिळणाऱ्या खाकी कागदाच्या पिशव्यांनी आता ६० रुपये किलो या दरापर्यंत मजल मारली आहे. प्लास्टिकच्या डिश, चमचे, द्रोण, अन्नपदार्थ पार्सल देण्यासाठी उपलब्ध असलेले खोके यांच्या मागणीतही वाढ झाली आहे, पण ज्या वेगाने प्लास्टिकच्या वस्तूंचा पुरवठा उद्योजकांकडून केला जातो त्या वेगाने या वस्तू उद्योजकांकडून विक्रेत्यांपर्यंत येत नसल्याचे कागदी वस्तूंचे व्यापारी अनिकेत देव यांनी सांगितले. कागदी वस्तूंच्या पॅकिंगसाठी प्लास्टिकच्या पारदर्शक पिशव्या पुरवल्या जात. मात्र आता घाऊक खरेदीकर्त्यांला वस्तू द्यायच्या कशा हा प्रश्न विक्रेत्यांसमोर असल्याचे देव यांनी नमूद केले.