breaking-newsमहाराष्ट्रमुंबई

काँग्रेस काँग्रेसचा पराभव करते, हा इतिहास बदलू या!

पुन्हा सत्तेवर येण्यासाठी मतभेद संपवण्याचे प्रदेशाध्यक्ष थोरात यांचे आवाहन

मुंबई : काँग्रेसचा पराभव काँग्रेसच करते असे इतिहास सांगतो, आता हा इतिहास बदलून राज्यात पुन्हा सत्तेवर येण्यासाठी लहान-मोठे सर्व प्रकारचे मतभेद गाडून टाका आणि विधानसभा निवडणुकीच्या मैदानात उतरा, असे आवाहन नवनियुक्त काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी पक्षाचे नेते आणि कार्यकर्त्यांना केले.  आगामी निवडणुकीत भाजप-शिवसेनेचा पराभव करण्यासाठी प्रसंगी काँग्रेस कमीपणा घेऊन समविचारी पक्षांना सोबत घेण्याचा प्रयत्न करील, असेही ते म्हणाले.

अशोक चव्हाण यांनी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर त्यांच्या जागी बाळासाहेब थोरात यांची नियुक्ती करण्यात आली. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर पक्षसंघटनेत बदल करताना प्रदेशाध्यक्षांच्या जोडीला पाच कार्याध्यक्षांची नेमणूक करण्यात आली. ती जबाबदारी डॉ. नितीन राऊत, बसवराज पाटील, मुझफर हुसेन, विश्वजित कदम व यशोमती ठाकूर यांच्यावर देण्यात आली आहे. गुरुवारी अध्यक्ष व कार्याध्यक्षांनी पदभार स्वीकारला. त्यानिमित्त यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान सभागृहात कार्यकर्ता मेळावा घेऊन काँग्रेसने जंगी शक्तिप्रदर्शन केले. या वेळी राज्याचे प्रभारी मल्लिकार्जुन खरगे, मावळते प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, माजी मुख्यमंत्री  सुशीलकुमार शिंदे, पृथ्वीराज चव्हाण, माणिकराव ठाकरे, हर्षवर्धन पाटील, विधिमंडळ पक्षाचे नेते के. सी. पाडवी, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, नसिम खान आदी नेत्यांची भाषणे झाली.

प्रदेशाध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर थोरात यांनी आता विधानसभा निवडणुकीला कशा प्रकारे सामोरे जायचे, त्यात अडचणी काय आहेत, याची जाणीव कार्यकर्त्यांना करून दिली. काळ कठीण आहे, संकटे मोठी आहेत, आव्हाने प्रचंड आहेत, परंतु अशा परिस्थितीतही काँग्रेसची सरकारे आली आहेत, याची आठवण करून देऊन कार्यकर्त्यांना दिलासा देण्याचा  प्रयत्न त्यांनी केला.

विखे भाजपमध्ये गेल्याने फायदाच : काही लोक पक्षातून गेले ते बरे झाले कारण त्यामुळे जागा रिकामी झाली, आता ती जागा तुम्ही घ्या, असा सल्ला थोरात यांनी राधाकृष्ण विखे-पाटील यांचा उल्लेख टाळून कार्यकर्त्यांना दिला.

चंद्रकांत पाटील यांना टोला : महसूलमंत्री चंद्रकांत पाटील भाजपचे प्रदेशाध्यक्ष झाले. त्या वेळी काँग्रेसचा एक कार्याध्यक्ष भाजपमध्ये येणार असल्याचे वक्तव्य त्यांनी केले. परंतु पत्रकारांनी जेव्हा त्यांना विचारले की, तुम्ही मंत्रीपद सोडणार का, त्यावर ते म्हणाले की माझे पाकीट कोरे आहे, त्यावर जो पत्ता लिहिला जाईल तिकडे मी जाईन. आता यांनाच यांचे भवितव्य माहीत नसताना दुसऱ्या पक्षातील कोण कुठे जाणार हे त्यांना कसे कळते, असा टोला थोरात यांनी लगावला.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button