breaking-newsराष्ट्रिय

काँग्रेस अन् भाजपचा पाठशिवणीचा खेळ

मध्य प्रदेशात बहुमतासाठी अटीतटी; * भाजप व काँग्रेसची मतांची टक्केवारी सारखी * सरकार स्थापनेचा काँग्रेसचा दावा * शहरी भागात भाजपला यश नाही * शेतकरी, युवकांची नाराजी भोवली, * चौहान मंत्रिमंडळातील अनेक मंत्री पराभूत

भोपाळ : मध्य प्रदेशातील काँग्रेसने दमदार कामगिरी करत भाजपला धक्का दिला. एखाद्या पालिका निवडणुकीत ज्याप्रमाणे प्रत्येक मत महत्त्वाचे असते त्याचा प्रत्यय मध्य प्रदेशात आला. उशिरापर्यंत भाजप व काँग्रेस यांच्यात सत्तेसाठी संघर्ष सुरू होता.  काँग्रेसने उशिरा सत्तास्थापनेचा दावा केला आहे. याबाबत प्रदेशाध्यक्ष कमलनाथ यांनी राज्यपाल आनंदीबेन पटेल यांना पत्र दिले आहे. काही अपक्षांचा पाठिंबा असल्याचा काँग्रेसचा दावा आहे. काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. शिवराजसिंह चौहान यांच्या सरकारमधील जवळपास डझनभर मंत्र्यांना धक्का बसला. विशेष म्हणजे आदिवासी बहुल जागांवरही भाजपला फटका बसला.

मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या प्रतिमेवर भाजप अवलंबून होता.  चौहान यांनी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अरुण यादव यांना पराभूत केले. या वेळी विरोधी काँग्रेसमधील गटा-तटांचे ऐक्य तसेच शेतकऱ्यांची नाराजी व उमेदवारी वाटपातील घोळ हे मुद्दे भाजपला भोवले. भाजपला अतिआत्मविश्वास नडल्याचे मानले जात

आहे. बहुतांश जनमत चाचण्यांनी राज्यात चुरशीची लढत होईल असे भाकीत तंतोतंत खरे ठरले. दोन्ही पक्षांची मते जवळपास सारखीच म्हणजे ४१ टक्क्यांच्या आसपास आहे.

राज्याचे विभागवार विश्लेषण केल्यास चंबळ खोऱ्यात काँग्रेसने एकतर्फी विजय मिळवला. इथे काँग्रेसला २६ तर भाजपला केवळ सहाच जागा जिंकता आल्या. ग्वाल्हेर-चंबळ भागातील या ३४ जागा महत्त्वपूर्ण होत्या. काँग्रेसचे युवा नेते ज्योतिरादित्य शिंदे यांनी या विभागात जोरदार प्रचार करत भाजपला धक्का दिला. विंध्य विभागातच भाजपला काय ते यश मिळले. इथे भाजपला ३६ तर काँग्रेसला १८ जागा मिळाल्या. इतरांना दोन जागा मिळवता आल्या. आदिवासीबहुल महाकौशल विभागात या वेळी काँग्रसने भाजपला रोखले. काँग्रेसला २४ तर भाजपला २२ जागाजिंकता आल्या. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष व छिंदवाडय़ाचे खासदार कमलनाथ तसेच भाजप प्रदेशाध्यक्ष राकेश सिंह हे दोघेही या भागातील आहेत.  या भागात जबलपूरसारख्या बालेकिल्ल्यात भाजपला पराभव झाला. शहरातील चार पैकी तीन जागा काँग्रेसने जिंकल्या सत्ताविरोधी लाटेचा भाजपला हादरा बसला. माळवा नेमाड प्रांतातील ६४ जागांवरही भाजपला अपेक्षित यश मिळाले नाही. भाजपला इथे ३८ तर काँग्रेसला २४ जागा मिळाल्या. माळवा आदिवासी पट्टय़ात भाजपचा दारुण पराभव झाला. इथे काँग्रेसला १८ तर भाजपला अवघ्या ८ जागा मिळाल्या.

विजयवर्गीय यांचे पुत्र विजयी

भाजपचे सरचिटणीस कैलास विजयवर्गीय यांचे पुत्र आकाश यांनी पहिल्याच निवडणुकीत विजय मिळवला. सुरुवातीला पिछाडीवर पडलेल्या आकाश यांनी इंदूर ३ या मतदारसंघातून काँग्रेसचे माजी आमदार अश्विन जोशी यांचा पाच हजारावर मतांनी पराभव केला. मात्र माजी मुख्यमंत्री कैलास जोशी यांचे पुत्र व भाजपचे मंत्री दीपक पराभूत झाले.

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी केंद्रीय मंत्री सुरेश पचौरी भोजपूर मतदारसंघातून पुन्हा पराभूत झाले. माजी मुख्यमंत्री सुंदरलाल पटवा यांचे पुतणे सुरेंद्र यांनी त्यांना २९ हजार मतांनी पराभूत केले. गेल्या निवडणुकीतही पचौरी पराभूत झाले होते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button