breaking-newsराष्ट्रिय

करीमनगरचं नाव बदलून करीपुरम ठेवणार – योगी आदित्यनाथ

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी तेलंगणात भाजपा सत्तेत आल्यास भाजपा करीमनगरचं नामांतर करेल असं आश्वासन दिलं आहे. करीमनगरचं नाव बदलून करीपुरम करु असं योगी आदित्यनाथ यांनी म्हटलं आहे. ‘तेलंगणात भाजपा सत्तेत आल्यास लोकांच्या भावनांचा आदर राखत करीमनगरचं नामांतर करीपुरम करण्याचा प्रयत्न करु’, असं आश्वासन योगी आदित्यनाथ यांनी दिलं आहे.

उत्तर प्रदेशातील अनेक शहरांची नामांतरं केल्याने आधीच योगी आदित्यनाथ यांना टीकेला सामोरं जावं लागत आहे. ट्विटरवर योगी आदित्यनाथ यांची खिल्ली उडवली जात आहे. मात्र तरीही नावं बदलण्याचा सपाटा अद्याप सुरु आहे. नुकतंच एका प्रचारसभेत बोलताना योगी आदित्यनाथ यांनी तेलंगणात भाजपाला निवडून दिल्यास हैद्राबादचं नाव बदलून भाग्यनगर करु असं आश्वासन दिलं होतं.

‘जर हैद्राबादचं भाग्यनगर करायचं असेल तर तुम्ही भाजपाला तेलंगणात सत्ता स्थापन करण्यासाठी मदत केली पाहिजे’, असं योगी आदित्यनाथ यांनी म्हटलं होतं. तेलंगणामधील माजी भाजपा नेता टी राजा सिंह लोध यांनीदेखील अनेक कार्यक्रमांमध्ये आपला पक्ष तेलंगणामधील शहरांची नावे बदलणार असल्याचं आश्वासन दिलं आहे.

योगी आदित्यनाथ यांनी उत्तर प्रदेशातील अनेक शहरांची नावे बदलली आहेत. अलाहाबादचं नाव बदलून प्रयागराज करण्यात आलं तर फैजाबादचं अयोध्या आणि मुघलसराई जंक्शनचं नाव पंडित दीन दयाल उपाध्याय जंक्शन करण्यात आलं आहे. दुसरीकडे भाजपा नेता जगन प्रसाद यांनी आग्राचं नाव बदलून अग्रवन किंवा अग्रवाल करण्याची मागणी केली आहे.

विरोधकांनी मात्र नामांतरावरुन नाराजी व्यक्त करत टीका केली आहे. इतकंच असेल तर भाजपाने शाहनवाज हुसेन, मुख्तार अब्बास नकवी आणि मोहसीन राजा यांची नावे बदलावीत असा टोला विरोधकांकडून लगावण्यात आला होता.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button