breaking-newsमहाराष्ट्रमुंबई

एसटी आता ‘रुग्णांच्या सेवेसाठी’ही!

पुण्यात १०० खाटांचे अतिविशेष रुग्णालय

आंदोलकांच्या हिंसाचारात होरपळणारी आणि तोटा सहन करीत सतत धावणारी ‘एसटी’ आता रुग्णसेवेचा वसाही स्वीकारणार आहे. पुण्यातील सांगवी येथे एसटी महामंडळ १०० खाटांचे अतिविशेष रुग्णालय उभारणार आहे.

‘प्रवाशांच्या सेवेसाठी’ हे ब्रीद जपणाऱ्या एसटीने आता आरोग्यसेवेत उतरण्याचा निर्णय घेतला आहे. इतकेच नव्हे तर रुग्णालयाच्या उत्पन्नातून नवी मुंबई येथे मोटार वाहन अभियांत्रिकी महाविद्यालय सुरू करण्याचाही एसटीचा विचार आहे.

रुग्णसेवा हे एसटीचे काम नाही तर प्रवाशांची सेवा हे तिचे काम आहे, असे सांगून राज्य सरकारने एसटीच्या रुग्णालय प्रकल्पाला विरोध केला होता. मात्र, एसटीचा रुग्णालय उभारणीचा हट्ट कायम आहे. सार्वजनिक-खासगी सहभागातून हे रुग्णालय उभारण्यात येणार आहे. रुग्णालय उभारण्यासाठी विकासकाची आणि प्रकल्प व्यवस्थापन करण्यासाठी सल्लागाराची नियुक्ती करण्यात येणार आहे. त्यासाठी निविदाही काढण्यात आली आहे.

एसटी महामंडळाने साधारण दोन वर्षांपूर्वी अद्ययावत अतिविशेष रुग्णालय उभारण्याची घोषणा केली होती. प्रवासी सेवांविषयी अन्य उपक्रम राबविण्यासाठी एसटीला राज्य सरकारची मंजुरी आवश्यक असते. रुग्णालय उभारणीचा प्रस्ताव काही महिन्यांपूर्वी सरकारकडे पाठविण्यात आला होता. त्याला मंजुरी मिळाल्यानंतर पुण्यातील सांगवी येथे एसटीच्या जागेतच रुग्णालय उभारणीची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

अतिविशेष अद्ययावत रुग्णालय बांधणे, प्रकल्पाची सार्वजनिक-खासगी सहभागातून आखणी करणे, प्रकल्प अहवाल तयार करणे, निविदाप्रक्रिया करून सक्षम विकासकाची निवड करणे आणि प्रकल्प व्यवस्थापन करण्यासाठी सल्लागाराची नियुक्ती करणे आदी कामे लवकरच केली जाणार असल्याचे एसटी महामंडळातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

हे रुग्णालय तीन वर्षांत बांधण्याचे उद्दिष्ट आहे. एसटी महामंडळ स्वखर्चातून हे रुग्णालय उभारणार होते. परंतु एसटीचे काम प्रवासी सुविधा देण्याचे असून वैद्यकीय सेवा देण्याचे नाही, असा शेरा त्या वेळी सरकारने मारला होता. त्यामुळे प्रस्तावही रखडला होता. त्यात फेरबदल करून सार्वजनिक-खासगी सहभागातून रुग्णालय उभारण्याचा निर्णय घेण्यात आला. तसा प्रस्ताव पुन्हा सरकारकडे मंजुरीसाठी पाठविला होता.

एसटी महामंडळाला नवी मुंबईत मोटार वाहन अभियांत्रिकी महाविद्यालय उभारायचे आहे. अतिविशेष रुग्णालयातून मिळणाऱ्या उत्पन्नातून हे महाविद्यालय उभारण्यात येणार आहे. या महाविद्यालयात साधारण १०० पेक्षा जास्त जागा असतील. २५ टक्के जागा एसटी कर्मचाऱ्यांच्या मुलांसाठी राखीव ठेवण्यात येतील.

एसटी रुग्णालयात..

  • बाह्य़ रुग्ण विभाग
  • शस्त्रक्रिया विभाग
  • पॅथॉलॉजी लॅब
  • एक्स-रे, स्कॅनिंग मशिन
  • रुग्णांसाठी १०० खाटा
  • २५ टक्के खाटा एसटी कर्मचाऱ्यांसाठी राखीव
Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button