breaking-newsमहाराष्ट्रमुंबई

एसटीचे चार महत्त्वाकांक्षी प्रकल्प कागदावरच

मोटार महाविद्यालय, अतिदक्षता रुग्णालय, पनवेल आधुनिक बस तळ, जेनेरिक औषध वितरणाला मुहूर्त नाहीच

एसटी महामंडळाच्या चार महत्त्वाच्या प्रकल्पांचे स्वप्न हे अपूर्णच राहिले आहे. मोटार वाहन अभियांत्रिकी महाविद्यालय, अतिदक्षता रुग्णालय, पनवेल स्थानकात आधुनिक बस तळ व सर्व बस स्थानकांत जेनेरिक औषधे असे प्रकल्प पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवलेल्या एसटी महामंडळाच्या या प्रकल्पांची गेल्या दोन ते तीन वर्षांत सुरुवातच झालेली नाही.

पनवेल बस स्थानकात आधुनिक बस तळाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते दीड वर्षांपूर्वी भूमिपूजनही झाले होते. मात्र, बस तळाची अद्याप एकही वीट रचली गेलेली नाही.

एसटी महामंडळाने नवी मुंबईत मोटार वाहन अभियांत्रिकी महाविद्यालय आणि पुण्यात अतिविशेष रुग्णालय उभारण्याचा निर्णय घेतला होता. महाविद्यालय आणि रुग्णालयाची घोषणा जानेवारी २०१६ मध्ये करण्यात आली होती. २०० जागांच्या अभियांत्रिकी महाविद्यालयात एसटी कर्मचाऱ्यांच्या मुलांना त्यांच्या गुणवत्तेनुसार काही टक्के जागा राखीव ठेवण्यात येणार होत्या. यातून शिक्षण घेऊन बाहेर पडणाऱ्यांना एसटीतही सामावून घेतले जाणार होते. परंतु शिक्षण मंडळासह अन्य तांत्रिक पूर्तता महामंडळाला करता आल्या नाहीत. त्यामुळे महाविद्यालयाचे काम थांबले.

एसटीच्या अतिविशेष रुग्णालयाचीही अवस्था तीच झाली. पुण्यातील शंकरशेठ मार्गाजवळच अद्ययावत वैद्यकीय सेवांबरोबरच १०० पेक्षा जास्त रुग्णांच्या उपचाराची व्यवस्था केली जाणार होती. शस्त्रक्रिया विभाग, पॅथोलॉजी लॅब, एक्स-रे, स्कॅनिंग मशिन इत्यादी अद्ययावत सेवांचा समावेश होता. २५ टक्के खाटा एसटी कर्मचारी आणि त्यांच्या नातेवाईंकांसाठी राखीव ठेवण्यात येणार होत्या. या रुग्णालय बांधणीसाठी दोन वेळा निविदाही काढली. परंतु त्यालाही प्रतिसाद मिळाला नाही.

जेनेरिक औषधे दूरच

राज्यातील बस स्थानकांवर स्वस्तात औषधे उपलब्ध करण्यासाठी एसटी महामंडळाने जेनेरिक (ब्रॅंड किंवा पेटंटशिवाय बनवलेली किंवा वितरित केलेली)औषधे देण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी अनेकदा निविदाही काढल्या. अखेर एका कंपनीने यात रुची दाखवली आहे. परंतु संबंधित कंपनीला काम देऊन सहा महिने उलटले तरीही राज्यातील ५६८ बस स्थानकांपैकी एकाही स्थानकात ही सुविधा सुरू झालेली नाही.

पनवेल बस तळासाठी कागदी घोडे

राज्यातील पंधरा एसटी स्थानकांवर आधुनिक बस तळांसह व्यापारी संकुलांचा प्रकल्प खासगी-सार्वजनिक भागीदारी तत्त्वावर राबविला जाणार होता. बसगाडय़ांसाठी तळघर, पहिल्या मजल्यावर प्रवाशांना बसण्याची व्यवस्था, चालक-वाहकांसाठी विश्रामगृह, प्रवाशांसाठी शॉपिंग मॉल, रेस्टॉरंट इत्यादी सुविधांचा योजनेत समावेश होता. दीड वर्षांपूर्वी पनवेल बस स्थानकात या प्रकल्पाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते भूमिपूजनही झाले. त्यानंतर अद्याप प्रकल्पाला सुरुवात झालेली नाही. प्रकल्पासाठी कागदोपत्री पूर्तता करण्यातच वेळ जात असल्याचे सूत्रांनी सांगितले.

पनवेल बस तळाचे काम लवकरच सुरू होईल. सध्या बस तळासाठी या आगारातील फेऱ्या अन्य आगारांत वळविण्यात आल्या आहेत. उर्वरित फेऱ्या चालवण्यासाठी आगारालगतच्या रिकाम्या जागेचा वापर केला जात आहे. जेनेरिक औषधांची दुकाने अद्यापही उभी राहिलेली नाहीत हे मान्य आहे. त्याचा आढावा घेऊ. मोटार वाहन अभियांत्रिकी महाविद्यालय आणि अतिविशेष रुग्णालय उभारण्याच्या निविदांना प्रतिसाद मिळालेला नाही. त्यामुळे प्रकल्प थांबलेला आहे. पुन्हा निविदा काढण्याचा विचार करू.          – रणजिंत सिंह देओल, उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, एसटी महामंडळ

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button