breaking-newsआंतरराष्टीयराष्ट्रिय

‘एम. जे. अकबर यांनी माझ्यावर बलात्कार केला होता’

लैंगिक छळाच्या आरोपांमुळे परराष्ट्र राज्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागलेले एम. जे. अकबर यांच्या अडचणी वाढल्या आहेत. सध्या अमेरिकेत वास्तव्यास असलेल्या महिला पत्रकाराने एम. जे. अकबर यांच्यावर बलात्काराचा आरोप केला आहे. एशियन एज या वृत्तपत्रात कार्यरत असताना एम. जे. अकबर यांनी जयपूरमधील हॉटेलच्या खोलीत माझ्यावर बलात्कार केल्याचा दावा पल्लवी गोगोई यांनी केला आहे.

‘मी टू’ मोहिमेत अनेक महिलांनी त्यांच्यावर झालेल्या लैंगिक अत्याचाराला सोशल मीडियाच्या माध्यमातून वाचा फोडली होती. यात एम. जे. अकबर यांच्यावरही आरोप झाले होते. एम. जे. अकबर एका इंग्रजी वृत्तपत्राचे संपादक असताना नोकरी देण्यासाठी घेतलेल्या मुलाखतीवळी अकबर यांनी कसा लैंगिक छळ केला याची माहिती सर्वप्रथम प्रिया रमाणी यांनी दिली होती. यानंतर आणखी महिलांनी एम. जे. अकबर यांच्यावर लैंगिक गैरवर्तणुकीचे आरोप केले होते. या आरोपांमुळे एम. जे. अकबर यांना परराष्ट्र राज्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला होता.

प्रिया रमाणी व अन्य महिलांविरोधात एम. जे. अकबर यांनी न्यायालयात मानहानीचा खटला दाखल केला असतानाच आता आणखी एका महिला पत्रकाराने एम. जे. अकबर यांच्यावर थेट बलात्काराचा आरोप केला आहे. पल्लवी गोगोई असे या महिला पत्रकाराचे नाव असून सध्या त्या अमेरिकेतील ‘नॅशनल पब्लिक रेडियो’त बिझनेस विभागाच्या संपादक आहेत. त्यांनी वॉशिंग्टन पोस्टमधील लेख लिहिला असून यात त्यांनी एम. जे. अकबर यांनी केलेल्या अत्याचाराला वाचा फोडली आहे.

पल्लवी गोगोई म्हणतात, २३ वर्षांची असताना मला एशियन एज या आघाडीच्या इंग्रजी वृत्तपत्रात संधी मिळाली. एम. जे. अकबर हे त्याकाळी आघाडीचे संपादक होते. त्यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळणार असल्याने मी आनंदात होते. ते वरिष्ठ पत्रकार असल्याचे नेहमीच दाखवून द्यायचे. कनिष्ठांच्या चुका दाखवायचे. एखादी बातमी न आवडल्यास कागदाचा बोळा करुन कचऱ्याच्या डब्यात फेकून द्यायचे. असा एकही दिवस नव्हता की ते आमच्यावर ओरडले नाहीत. त्यांचे भाषेवरील प्रभूत्व पाहून आपणही त्यांच्यासारखं लिहायला शिकलं पाहिजे असं माझ्यासारख्या तरुण पत्रकारांना वाटायचे. माझ्याकडे संपादकीय पानाची जबाबदारी होती. मी १९९४ मधील ती घटना असेल. त्यांनी कार्यालयातील कॅबिनमध्येच चुंबन घेण्याचा प्रयत्न केला. मी कशीबशी स्वत:ची सुटका करुन घेतली आणि तिथून पळ काढला. माझी कार्यालयातील सहकारी तुशिताने देखील माझी अवस्था बघितली होती, असे त्यांनी सांगितले.

एम. जे. अकबर यांनी दुसऱ्यांदा मुंबईतील पंचतारांकित हॉटेलच्या खोलीत मला कामानिमित्त बोलावून घेतले. मासिक लाँच करण्यासाठी आम्ही मुंबईत आलो होते. त्यावेळीही अकबर यांनी चुंबन घेण्याचा प्रयत्न केला. मी तेव्हा देखील तिथून पळ काढला. मी पुन्हा दिल्लीत परतले. मी घाबरले होते आणि मनात रागही होता. पण अकबर यांनी घटनेची कुठे वाच्यता केल्यास कामावरुन काढून टाकण्याची धमकी दिल्याने मी काहीच करु शकले नाही, असे त्यांनी म्हटले आहे.

पल्लवी पुढे सांगतात, काही महिन्यांनी मी जयपूरमध्ये एका बातमीसाठी गेले होते. अकबर यांनी त्या बातमीवर चर्चा करण्यासाठी जयपूरमधील हॉटेलच्या खोलीत मला बोलावून घेतले. तिथे त्यांनी माझ्यावर बलात्कार केला. यानंतर वेळोवेळी ते माझा शारीरिक आणि मानसिक छळ करत होते. पुरुष सहकाऱ्यांशी बोलताना बघितल्यास ते माझ्यावर ओरडायचे. इतकेच नव्हे लंडनमध्ये त्यांनी मला मारहाण देखील केली होती, असे पल्लवी यांनी म्हटले आहे. पल्लवी या सध्या अमेरिकेत स्थायिक झाल्या असून पतीशी चर्चा केल्यानंतरच मी हे लिहिण्याचा धाडसी निर्णय घेतल्याचे त्यांनी म्हटले आहे. दरम्यान, ए. जे. अकबर यांच्या वकिलांनी पल्लवी गोगोई यांनी केलेले फेटाळून लावले आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button