breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणे

एम्पायर इस्टेट पुलाचे पालकमंत्र्याच्या हस्ते उद्घाटन

पिंपरी- महापालिकेतर्फे चिंचवड येथे उभारण्यात आलेल्या एम्पायर इस्टेट पुलाचे काम अखेर मार्गी लागले आहे. पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांच्या हस्ते आज (सोमवारी) पुलाचे लोकार्पण करण्यात आले. तसेच या पुलाचे संत मदर तेरेसा असे नामकरण देखील करण्यात आले आहे. हा पूल वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे.

यावेळी महापौर नितीन काळजे, भाजपचे शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप, महेश लांडगे, उपमहापौर शैलजा मोरे, स्थायी समिती अध्यक्षा ममता गायकवाड, सभागृह नेते एकनाथ पवार, विधी समिती सभापती माधुरी कुलकर्णी, क्रीडा समिती सभापती संजय नेवाळे, नगरसेवक विलास मडिगेरी, शीतल शिंदे आदी उपस्थित होते.

पिंपरी-चिंचवड महापालिकेने जवाहरलाल नेहरु नागरी पुनर्निर्माण अभियानांतर्गत (जेएनएनयूआरएम) अकरा किलोमीटर लांबीच्या काळेवाडीफाटा ते देहू – आळंदी (219.20) या बीआरटी प्रकल्पाअंतर्गत सुमारे 1600 मीटर लांबीच्या चिंचवड – एम्पायर इस्टेट येथे उड्डाणपूल उभारण्याचा निर्णय घेतला. या पुलाला 2010 मध्ये मान्यता मिळाली. त्यासाठी सन 2011 मध्ये निविदा प्रसिद्ध करण्यात आली. प्रत्यक्षात 6 एप्रिल 2011 ला पुलाच्या कामाला सुरुवात झाली होती. गेल्या अनेक वर्षांपासून विविध कारणांमुळे पुलाचे काम रखडले होते. तब्बल आठ वर्षांनी आता पुलाचे काम पुर्ण झाले आहे.

बीआरटीएसच्या कामातील पवना नदी, मुंबई-पुणे रेल्वे आणि पुणे-मुंबई महामार्ग ओलांडणारा उड्डाणपूल एम्पायर इस्टेट येथे बांधण्यात आला आहे. तो 1.60 किलोमीटर लांबीचा आणि नदी, महामार्ग अडथळे ओलांडून जाणारा आहे. त्याची रुंदी 23 ते 30 मीटर आहे. या मार्गाच्या आखणीत स्वतंत्र बीआरटी लेन आणि इतर वाहनांसाठी 5.5 ते 7 मीटर रुंदीच्या स्वतंत्र मार्गाचा समावेश आहे. पादचा-यांसाठी पवना नदी व रेल्वेवरील पुलावर स्वतंत्र दोन मीटरचा मार्ग तसेच चारही बाजूंनी चढण्या-उतरण्यासाठी जिन्यांची सोय करण्यात आली आहे. उड्डाणपुलामध्ये 1.8 मीटर रुंदीचा पादचारी आणि सायकलसाठी स्वतंत्र मार्ग राखीव आहे. पादचारी व सायकलवरून जाणा-यांच्या सुरक्षेसाठी या मार्गाच्या दोन्ही बाजूस काँक्रीटचे अंटिक क्रॅशन रेलिंग आहे. हा उड्डाणपूल निवासी भागातून येत असल्याने तेथील रहिवाशांचा विचार करून ध्वनिप्रदूषण टाळण्यासाठी नॉईज बॅरिअर्सचा समावेश करण्यात आला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button