breaking-newsमहाराष्ट्रमुंबई

एटीएसच्या कारवाईने भांडार आळी गावाची झोप उडवली

मुंबई – नालासोपाऱ्यातील भांडार आळी येथे काल रात्री ७.३० वाजल्यापासून दहशतवादविरोधी पथकाची (एटीएस) कारवाई सुरु होती. या कारवाईदरम्यान आज सकाळी वैभव राऊतला ताब्यात घेऊन एटीएसचे पथक मुंबईकडे रवाना झाले. मात्र, रात्रभर चाललेल्या या कारवाईमुळे गावकऱ्यांनी संपूर्ण रात्र जागून काढली. वैभवच्या पाठीशी संबंध गाव असल्याचा दावा गावकऱ्यांनी केला आहे.

नालासोपाऱ्यातील भांडार आळी गावात लक्षद्वीप या दुमजली इमारतीत वैभव आपल्या दोन काकांच्या कुटुंबियांसोबत राहतो. पूर्वजांपासून वैभवचे आई – वडील याठिकाणी राहतात. भांडार आळी हे १ हजार लोकांचं गाव असून या गावात वैभवची इस्टेट एजंट म्हणून ओळख आहे. पूर्वी वैभवच्या वडिलांचा ट्रांस्पोटेशनचा व्यवसाय होता. तर दुसरे काका शिवसैनिक होते आणि ते सध्या हयात नाहीत अशी माहिती गावकरी हर्षद राऊत यांनी दिली. वैभव हा विवाहित असून त्यांना एक मुलगा तर एक मुलगी आहे. त्याचे वडील हयात नसून आईसोबत राहतो. अचानक काल रात्री ७, साडेसातच्या सुमारास काही पोलीस वैभवच्या राहत्या घरी धाड घालण्यास आले. त्यावेळी आम्हाला काहीच जाणीव नव्हती. मात्र, रात्री साडेआठच्या सुमारास पोलिसांची कुमक आली. तेव्हा आम्हाला काहीतरी संशयास्पद कारवाई होत असल्याचे कळाले. त्यानंतर आम्ही सर्व गावकरी रात्रभर जागे आहोत असे हर्षद यांनी सांगितले. साईदर्शन या चार मजली इमारतीत वैभवच्या एका दुकानाच्या गाळ्यात ८ गावठी बॉम्ब सापडले आणि आम्हाला धक्काच बसला. वैभव असे करेल असे अजिबात वाटत नाही आम्ही सर्व गावकरी त्याच्या सोबत आहोत असे हर्षदने पुढे सांगितले.

तो कट्टर गोरक्षक आहे. उघड्यावर बकऱ्यांची कत्तल केली तर त्याला खपत नसे तो कायदेशीर कारवाईसाठी पोलिसांकडे धाव घेत असे. मात्र काही अतिरेकी कारवाया करेल असे वाटत नाही. एटीएसने कारवाई दरम्यान त्याच्या घरच्यांना किंवा कोणत्याही गावकऱ्याला विश्वासात घेतले नाही असा आरोप गावकरांनी केला आहे. एटीएसच्या कारवाईने मात्र भांडार आळी गावाची झोप उडवली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button