एक दिवस रेल्वे मंत्री व्हा – पियुष गोयल यांची पत्रकाराला “ऑफर’
नवी दिल्ली – “एक दिवस केंद्रीय रेल्वे मंत्री व्हा.’ अशी ऑफर केंद्रीय रेल्वे मंत्री पियुष गोयल यांनी एका पत्रकाराला दिली. अशी ऑफर देऊन त्या पत्रकारालाच नाही, तर देशभरातील मीडियाला त्यांनी चकित करून सोडले आहे. चित्रपटात शोभावा असा प्रसंग एका पत्रकार परिषदेत घडला आहे.
मोदी सरकारला चार वर्षे पूर्ण झाली, त्या निमित्ताने आयोजित पत्रकार परिषदेत पियुष गोयल रेल्वेच्या कामगिरीचा आढावा घेत होते. एका पत्रकाराने रेल्वेसमस्यांसंबंधी एक पत्र गोयल यांना दिले. पत्र वाचल्यानंतर गोयल यांनी त्या पत्रकारालाच एक दिवस रेल्वे मंत्री बनण्याची ऑफर दिली.
नायक या चित्रपटात अमरीश पुरी अनिल कपूरला एक दिवसाचा मुख्यमंत्री बनण्याची ऑफर देतो, त्याची आठवण करत ते पत्रकाराला म्हणाले, रेल्वे मंत्री बनून तुम्हीच नियम-कायदे अंमलात आणा. मात्र नंतर गमतीचा भाग बाजूल ठेवत ते त्या पत्रकाराला म्हणाले, तुमच्या सूचनांचा अवश्य विचार करण्यात येईल.
रेल्वे गाडया उशिरा धावत असल्याने रेल्वे विभागाला मोठ्या टीकेला सामोरे जावे लागत आहे. काही रेल्वे गाड्यांनी तर अनेक तास उशिरा धावत विक्रमच केले आहेत. असे चालत राहिल्यास अधिकाऱ्यांचे प्रमोशन रोखण्यात येईल असे गोयल यांनी सांगितले. मेन्टेनन्समुळे रेल्वे गाड्यांना उशीर होत असल्याचे रेल्वे विभागाने कारण दिले आहे.