एक्सलन्सी ऍकॅडमी-बॉम्बे इंजिनिअरिंग ग्रुप विजेतेपदासाठी लढत रंगणार
सातवी कै. हुसेन मेमोरियल हॉकी अजिंक्यपद स्पर्धा
पुणे: एक्सलन्सी ऍकॅडमी आणि बॉम्बे इंजिनिअरिंग ग्रुप यांच्यात सातव्या कै. हुसेन हॉकी स्पर्धेच्या विजेतेपदासाठी लढत होणार आहे. कै. हुसेन नाबी शेख हॉकी आणि स्पोर्टस् फाऊंडेशनतर्फे ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.
उपान्त्य फेरीत एक्सलन्सी ऍकॅडमी संघाने क्रीडा प्रबोधिनी संघाचा, तर खडकीच्या बॉम्बे इंजिनिअरिंग ग्रुप संघाने हॉकी युनायटेड संघाचा पराभव केला.
मेजर ध्यानचंद हॉकी स्टेडियम, नेहरूनगर पिंपरी येथे सुरू असलेल्या या स्पर्धेतील अत्यंत रंगतदार ठरलेल्या पहिल्या उपान्त्य लढतीत एक्सलन्सी ऍकॅडमी संघाने सडन डेथमध्ये क्रीडा प्रबोधिनीचा पराभव करून अंतिम फेरी गाठली.
अतिशय अटीतटीच्या झालेल्या सामन्यात निर्धारित वेळेअखेर 3-3 अशी बरोबरी झाली. तसेच पेनल्टी शूटआऊटमध्येही 2-2 अशी बरोबरी राहिली. त्यानंतर निर्णायक सडन डेथमध्ये एक्सलन्सी संघाने बाजी मारली. युवराज वाल्मिकी याने तीन गोल करताना एक्सलन्सी ऍकॅडमीच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. विनीत शेट्टी व विनीत कांबळे यांनी त्याला सुरेख साथ दिली.
उपान्त्य फेरीच्या दुसऱ्या सामन्यात खडकीच्या बॉम्बे इंजिनिअरिंग ग्रुप संघाने हॉकी युनायटेड संघाचा 5-2 असा सहज पराभव करून अंतिम फेरी गाठली. यामध्ये बीईजीकडून राहुल तिर्के याने तीन गोल करताना विजयात मोलाचा वाटा उचलला. तर जवालम कुजर व कांचन राजभेर यांनी प्रत्येकी एकेक गोल करताना त्याला सुरेख साथ दिली. हॉकी युनायटेड संघाकडून वाजिद शेख व अरविंद यादव यांनी गोल करताना झुंज दिली.