breaking-newsमहाराष्ट्रमुंबई

एकही रुपया खर्च न करता खरेदी केली १५०० विमान तिकीटं, ट्रॅव्हल पोर्टल्सना गंडा घालणारा अटकेत

मध्य प्रदेशातील २७ वर्षीय तरुणाने गेल्या दोन वर्षात एक रुपयाही खर्च न करता १५५० विमानं तिकीट खरेदी करत किमान चार ट्रॅव्हल्स पोर्टलला गंडा घातल्याचं समोर आलं आहे. राजप्रताप परमार असं आरोपीचं नाव असून त्याच्यासोबत दोन नातेवाईंकांनाही अटक करण्यात आली आहे. आरोपीने गंडा घालत जवळपास दोन कोटींची कमाई केली होती अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

विशेष म्हणजे आरोपी राजप्रताप परमारचं फक्त बारावीपर्यंत शिक्षण झालं आहे. ट्रॅव्हल्स पोर्टलवरील पेमेंट गेटवे सिस्टमवर त्रुटी असल्याचं लक्षात आल्यानंतर राजप्रताप परमार याने देशभरातील अनेक ट्रॅव्हल्स एजन्सींसोबत संपर्क साधला आणि बाजारात असलेल्या तिकीट दरापेक्षा कमी किंमतीत ८० टक्क्यांनी तिकीट देण्याची ऑफर दिली.

मुंबईमधील एका प्रवाशामुळे हा घोटाळा उघड झाला. या प्रवाशाने गोव्याला जाणाऱ्या विमानाचं तिकीट बुक केलं होतं. जेव्हा त्याने तिकीटाची प्रिंटआऊट घेतली तेव्हा त्याच्यावरील मोबाइल क्रमांक आणि ईमेल आयडी चुकीचं असल्याचं लक्षात आलं. याशिवाय तिकीटासाठी भरलेले पैसे आणि तिकीटावर लिहण्यात आलेल्या रकमेत तफावत असल्याचंही त्याच्या निदर्शनास आलं.

आपल्या वैयक्तिक माहितीसोबत फेरफार करण्यात आल्याची शंका आल्याने प्रवाशाने मुंबई गुन्हे शाखेच्या युनिट क्रमांक ७ कडे लिखीत तक्रार दिली. तपास केला असता मुंबई गुन्हे शाखेच्या युनिट क्रमांक ७ चे प्रमुख सतीश तावरे आणि पोलीस निरीक्षक एन श्रीधनकर यांना या घोटाळ्याची माहिती मिळाली. तपास करणाऱ्या अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, दोन वर्षांपुर्वी आरोपी राजप्रताप परमार याला ट्रॅव्हल पोर्टलच्या पेमेंट गेटवेमध्ये त्रुटी असल्याचं लक्षात आलं आणि त्याने याचा फायदा उचलण्याचं ठरवलं.

‘राजप्रताप परमार देशभरातील एजंटकडून ट्रॅव्हल बुकिंग घेत असे. ऑनलाइन डिटेल भरताना परमार संबंधित व्यक्तीची चुकीची माहिती भरत असे. परमार जाणुनबुजून चुकीचा मोबाइल क्रमांक आणि ईमेल आयडी देत असे, जेणेकरुन संबंधित व्यक्तीला कोणताही मेसेज अलर्ट जाऊ नये. यानंतर तो कार्ड डिटेल देऊन सबमिट आणि कॅन्सल पेमेंटचा ऑप्शन मिळेपर्यंत ट्रान्झॅक्शन सुरु ठेवत असे’, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

‘यानंतर परमार कॅन्सल बटण दाबायचा आणि वारंवार एस्केप बटण दाबून ते पेज थांबवून ठेवण्याचा प्रयत्न करायचा. यानंतर तो युआरएलशी छेडछाड करायचा आणि आपण सबमिट बटणावर क्लिक केलं होतं हे भासवण्यासाठी त्यात Success हा शब्द टाकायचा. यानंतर ही लिंक दुसऱ्या टॅबमध्ये कॉपी पेस्ट करुन एंटर बटणवर क्लिक करत असे. यामुळे सिस्टमला पेमेंट झालं आहे असं वाटायचं आणि तिकीट जनरेट केलं जायचं. विशेष म्हणजे एक रुपयाची खर्च न करता परमार हे तिकीट बुक करायचा’, असं अधिकाऱ्याने सांगितलं आहे.

परमार याने आपले दोन नातेवाईंक परमसिंग परमार आणि राघवेंद्र सिंह यांच्या माध्यमातून ट्रॅव्हल्स एजन्सींशी संपर्क साधला होता. आपल्याला मिळणाऱ्या पैशांमधील काही वाटा देण्याचं अमिष त्याने दाखवलं होतं. आरोपी परमार ट्रॅव्हल्स एजन्सींना बाजारभावापेक्षा कमी ८० टक्क्यांनी तिकीट विक्री करत असल्याने तो चांगलाच प्रसिद्ध झाला होता. अनेक एजंटनी त्याच्याशी संपर्क साधला होता.

गेल्या दोन वर्षात आपण ७५० ते ८०० तिकीटांची विक्री केल्याचं आरोपी परमारने सांगितलं आहे. या सर्व तिकीटांची एकूण किंमत कोटींमध्ये आहे. आम्हाला त्याने १५०० तिकीटांची विक्री केली असल्याचा संशय आहे असं पोलिसांनी सांगितलं आहे. या घोटाळ्यात अजून कोणी सहभागी आहे का याचा पोलीस तपास करत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button